मिरजेत डॉक्टरचा बंगला फोडून लाखाचा ऐवज लंपास
By admin | Published: June 7, 2015 12:32 AM2015-06-07T00:32:47+5:302015-06-07T00:33:53+5:30
शहर पोलिसात फिर्याद
मिरज : येथील शल्यविशारद डॉ. विराज लोकूर यांचा बंगला फोडून चोरट्यांनी लाखाचा ऐवज लंपास केला. डॉ. लोकूर परदेश दौऱ्यावर गेले होते.
डॉ. विराज लोकूर यांचा मिरज-सांगली रस्त्यावर भोकरे कॉलनीत बंगला आहे. डॉ. लोकूर कुटुंबीय गेले दहा दिवस युरोप दौऱ्यावर गेले होते. शुक्रवारी रात्री डॉ. लोकूर मिरजेत परत आल्यानंतर त्यांचा बंगला फोडून ऐवज लुटल्याचे निदर्शनास आले. डॉ. लोकूर यांनी परदेशी जाताना दागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवल्याने मौल्यवान ऐवज बचावला. चोरट्यांनी घरातील कपाटे फोडून कपडे व साहित्य विस्कटले. १५ हजार रोख रक्कम, देवघरातील चांदीच्या मूर्ती, मोत्याची माळ, सोनी कंपनीचे दोन एलईडी टीव्ही असा लाखाचा ऐवज चोरून नेला. चोरट्यांनी बंगल्याचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. जाताना मुख्य दरवाजा आतून बंद करून दुसरा दरवाजा उघडून चोरटे पळून गेले. चोरट्यांचा रूमाल बंगल्यात सापडला.
चोरीबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक संजय गोरले यांच्यासह पोलीस फौजफाटा घटनास्थळी आला. श्वानपथकाच्या साहाय्याने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र श्वानपथक बंगल्याच्या परिसरात घुटमळले. चोरीबाबत डॉ. विराज लोकूर यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. (वार्ताहर)