डॉक्टरांच्या बंदचा खासगी रुग्णसेवेला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 01:34 AM2019-06-18T01:34:00+5:302019-06-18T01:34:36+5:30
कोलकाता येथे डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने पुकारलेल्या डॉक्टरांच्या देशव्यापी काम बंद आंदोलनास कोल्हापुरात मोठा प्रतिसाद मिळाला. अनेक खासगी रुग्णालयांतील डॉक्टरांनी बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवून,
कोल्हापूर : कोलकाता येथे डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने पुकारलेल्या डॉक्टरांच्या देशव्यापी काम बंद आंदोलनास कोल्हापुरात मोठा प्रतिसाद मिळाला. अनेक खासगी रुग्णालयांतील डॉक्टरांनी बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवून, संपात सहभाग घेतल्याने रुग्णसेवेला काही प्रमाणात फटका बसला. तथापि, अत्यावश्यक रुग्णसेवा सुरू होत्या.
कोल्हापूर मेडिकल असोसिएशनसह अनेक वैद्यकीय संघटनांच्या शिष्टमंडळांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराचा निषेध नोंदविला. तसेच या आंदोलनात ‘केएमए’च्या सुमारे एक हजारहून अधिक डॉक्टरांनी सहभाग नोंदविला.
‘आयएमए’च्या आदेशानुसार सोमवारी जिल्ह्णातील सकाळी सहा ते मंगळवारी सकाळी सहा असे २४ तास बाह्यरुग्ण विभागांसह वैद्यकीय सेवा बंद राहिल्या. या आंदोलनात कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे सर्व सभासद डॉक्टर सहभागी झाले होते. त्यांनी आपले दवाखान्याचे ‘ओपीडी’ विभाग बंद ठेवले होते. रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी मोठ्या रुग्णालयात अत्यावश्यक रुग्णसेवा आणि तातडीच्या शस्त्रक्रिया सुरू होत्या.
कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या शिष्टमंडळाने दुपारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिजित देशमुख यांना निवेदन देऊन, असे प्रकार भविष्यात होऊ नये म्हणून डॉक्टरांना संरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी असे प्रकार घडल्यास डॉक्टरांनी गप्प न बसता ‘झिरो टॉलरन्स’साठी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधल्यास आम्ही कारवाई करू, अशी ग्वाही अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिली. या शिष्टमंडळात असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संदीप साळोखे, उपाध्यक्ष डॉ. आबासाहेब शिर्के, सचिव डॉ. आशा जाधव, डॉ. पी. एम. चौगुले, डॉ. राजेंद्र वायचळ, डॉ. ए. बी. पाटील, डॉ. संदीप पाटील, डॉ. शीतल देसाई, डॉ. किरण दोशी यांच्यासह १00हून अधिक डॉक्टरांचा सहभाग होता.
यांनी दिला पाठिंबा
केमिस्ट असोसिएशन, जनरल प्रॅक्टिशियल असोसिएशन (जीपीए), निहा, (होमीओपॅथिक असोसिएशन), मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन, निमा (नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असो.), डेन्टल असोसिएशन, सर्जन असोसिएशन (केएसएस), फिजिशियन असोसिएशन, कान-नाक-घसा सर्जन असो. या वैद्यकीय क्षेत्रातील संस्थांनी ‘आयएमए’च्या आंदोलनास पाठिंबा व्यक्त केला.
कोलकाता येथे डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ सोमवारी इंडियन मेडिकल असोसिएशनने पुकारलेल्या डॉक्टरांच्या देशव्यापी काम बंद आंदोलनास कोल्हापुरात प्रतिसाद मिळाला. कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना निवेदन देण्यात आले.