हल्ले, खंडणीप्रकरणी डॉक्टरांनी तक्रारी द्याव्यात : प्रेरणा कट्टे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 12:20 PM2019-10-23T12:20:35+5:302019-10-23T12:24:41+5:30
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ‘वुमन्स डॉक्टर विंग’ यांच्या वतीने कट्टे, राज्यातील पहिल्या जिल्हा शल्यचिकि त्सक डॉ. कुसुम वाळुंजकर आणि टेबिलटेनिसपटू शैलजा साळोखे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
कोल्हापूर : डॉक्टरांवर हल्ले आणि खंडणी मागणीचे प्रकार वाढले असून, संबंधितांविरोधात तक्रार देण्यासाठी डॉक्टरांनी पुढे येण्याची गरज असल्याचे मत शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी मंगळवारी व्यक्त केले.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ‘वुमन्स डॉक्टर विंग’ यांच्या वतीने कट्टे, राज्यातील पहिल्या जिल्हा शल्यचिकि त्सक डॉ. कुसुम वाळुंजकर आणि टेबिलटेनिसपटू शैलजा साळोखे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. सत्काराला उत्तर देताना कट्टे बोलत होत्या. ‘नीमा वुमन्स फोरम’ यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कट्टे म्हणाल्या, डॉक्टर्स आणि पोलिसांचे काम २४ तासांचे असते. आम्हांला जनतेच्या संरक्षणाचे काम करावे लागते; तर डॉक्टरना रुग्णांचे आरोग्य सांभाळावे लागते. समाजाच्या भल्यासाठी आपण कार्यरत असतो; परंतु किरकोळ कारणांवरून डॉक्टरांना त्रास देण्याचे प्रकार वाढले आहेत. यामध्ये राजकीय दबाव न घेता डॉक्टरांनी तक्रारी द्याव्यात.
डॉ. कुसुम वाळुंजकर म्हणाल्या, ज्यावेळी जिल्हा आरोग्याधिकारी म्हणून महिला डॉक्टरकडे कार्यभार देताना दहादा विचार व्हायचा, अशावेळी मला राज्यातील पहिली महिला जिल्हा शल्यचिकि त्सक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. सध्या डॉक्टरांकडे पाहण्याचा समाजाचा बदलता दृष्टिकोन चिंताजनक वाटत आहे.
शैलजा साळोखे म्हणाल्या, ज्यावेळी पुरुषही मोठ्या संख्येने टेबलटेनिस खेळत नव्हते तेव्हा मी या खेळामध्ये उतरले आणि राष्ट्रीय पातळीपर्यंत यश मिळविले, याचा कोल्हापूरकर म्हणून मला अभिमान आहे. कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संदीप साळोखे यांनी महिला डॉक्टरांनी विविध उपक्रमांमध्ये सहभाग वाढवावा, असे आवाहन केले. यावेळी डॉ. मुकुंद मोकाशी, डॉ. आशा जाधव, डॉ. मधुरा कुलकर्णी, डॉ. क्रांती पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. गायत्री होशिंग, डॉ. राजेंद्र वायचळ उपस्थित होते. डॉ. मंजिरी वायचळ यांनी सूत्रसंचालन केले.
- दोघांनाही मूळ शोधावे लागते
डॉक्टर म्हणून तुम्हाला आरोग्याच्या निर्माण झालेल्या प्रश्नाचे, तर आम्हांला घडलेल्या गुन्ह्याचे मूळ शोधावे लागते. दोघांचाही व्यवसाय, नोकरी मूळ शोधण्याचाच आहे, असे प्रेरणा कट्टे यांनी सांगताच त्याला सर्वांनीच प्रतिसाद दिला.