‘सीपीआर’मधील डॉक्टराचे आजपासून काम बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:16 AM2021-07-22T04:16:23+5:302021-07-22T04:16:23+5:30
कोल्हापूर : येथील रा. छ. शा. म. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तात्पुरत्या नियुक्तीने कार्यरत असलेल्या सहायक प्राध्यापक व वैद्यकीय अधिकारी ...
कोल्हापूर : येथील रा. छ. शा. म. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तात्पुरत्या नियुक्तीने कार्यरत असलेल्या सहायक प्राध्यापक व वैद्यकीय अधिकारी आज, गुरुवारपासून बेमुदत कालावधीतसाठी काम बंद आंदोलन करणार आहेत. गेले चार महिन्याचे थकीत वेतन त्वरित मिळावे या मागणीसाठी हे सर्व डॉक्टर आंदोलन करत आहेत. बुधवारी दुपारी आंदोलनप्रश्नी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. ए. एम. मोरे व डॉक्टरांची चर्चा झाली, पण त्यातून कोणताही मार्ग न निघाल्याने डॉक्टरांनी आंदोलनाचा निर्णय कायम ठेवला.
आंदोलनात ४० वैद्यकीय अधिकारी व ५५ प्राध्यापक सहभागी होत आहेत. डॉक्टरांच्या काम बंद आंदोलनामुळे त्याचा रुग्णसेवेवर परिणाम होणार आहे.
कोरोना महामारीमध्ये अहोरात्र काम करणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयातील अनेक सहायक प्राध्यापक व वैद्यकीय अधिकारी हे गेल्या कित्येक वर्षांपासून तात्पुरत्या नियुक्त्यावर कार्यरत आहेत. या डॉक्टरांचे गेल्या चार महिन्यांपासून वेतन दिलेले नाही. ते देण्याबाबत प्रशासन स्तरावर कोणतेही ठोस पाऊल उचलले नसल्यामुळे डॉक्टरांनी काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, आंदोलनाबाबत दुपारी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता मोरे व डॉक्टरांची बैठक झाली. त्यावेळी मोरे यांनी थकीत वेतनाबाबत आरोग्य उपसंचालकांशी फोनवर चर्चा केली. त्यानंतर डॉक्टरांना आठवडाभर आंदोलन न करण्याचे आवाहन केेले. पण डॉक्टरांनी आंदोलनाचा पावित्रा कायम ठेवला.
अधिष्ठातांच्या दालनासमोर एकत्र
संपाचा निर्णय घेतल्यानंतर सर्व डाॅक्टर आज, गुरुवारी सकाळी १०.३० वाजता वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता ए. एम. मोरे यांच्या दालनात एकत्र येऊन पुढील निर्णय घेणार आहेत.