डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे नातेवाइकांचा बनाव उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:26 AM2021-04-02T04:26:04+5:302021-04-02T04:26:04+5:30
कोरोनाबाधित वृद्धाच्या मुत्यूनंतर शवविच्छेदनावरून जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात गोंधळ उडाला. कोरोनाने झालेल्या मुत्यूची माहिती लपवून ठेवून अपघाती मुत्यू झालाचा ...
कोरोनाबाधित वृद्धाच्या मुत्यूनंतर शवविच्छेदनावरून जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात गोंधळ उडाला. कोरोनाने झालेल्या मुत्यूची माहिती लपवून ठेवून अपघाती मुत्यू झालाचा बनाब वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. पोलीस आल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.
याबाबत माहिती अशी, शहरापासून जवळ असलेल्या गावातील ६२ वर्षीय वृद्धाचा पंधरा दिवसांपूर्वी अपघात झाला होता. वृद्धावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले. त्यानंतर ताप आल्याने कुटुंबीयांनी उपचारासाठी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी औषधे दिल्यानंतर त्यांना घरी नेण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. अपघाती मुत्यू झाल्याचे भासवून मृतदेह जयसिंगपूर प्राथमिक रुग्णालयात आणल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णाच्या एचआरसीटीच्या अहवालाची मागणी केली. यावेळी नातेवाइकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. खासगी रुग्णालयात संपर्क साधल्यांनंतर त्यांचा अहवाह कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे कुटुंबीयांचा खोटेपणा उघडकीस आला. अखेर पोलीस आल्यानंतर प्रकरणावर पडदा पडला. दरम्यान, संपर्कातील व्यक्तींना तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.