कोल्हापूरच्या मर्दानी खेळावरील माहितीपटाला प्रतिष्ठेचा फिल्मफेअर, पंचवीस मिनिटांसाठी तीस लाख रुपये खर्च

By संदीप आडनाईक | Published: December 22, 2022 12:03 PM2022-12-22T12:03:35+5:302022-12-22T12:03:55+5:30

दोनवेळा फिल्मफेअर मिळवून कोल्हापूरचे नाव उंचावले 

Documentary on Kolhapur Masculine Sports gets prestigious Filmfare award | कोल्हापूरच्या मर्दानी खेळावरील माहितीपटाला प्रतिष्ठेचा फिल्मफेअर, पंचवीस मिनिटांसाठी तीस लाख रुपये खर्च

कोल्हापूरच्या मर्दानी खेळावरील माहितीपटाला प्रतिष्ठेचा फिल्मफेअर, पंचवीस मिनिटांसाठी तीस लाख रुपये खर्च

googlenewsNext

कोल्हापूर : कोल्हापूरचा निर्माता आणि दिग्दर्शक सचिन बाळासाहेब सूर्यवंशी यांनी मर्दानी खेळावर तयार केलेल्या 'वारसा' या महितीपटाला २०२२ या वर्षाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. नॉन फिक्सन गटात उत्कृष्ट फिल्मचा हा पुरस्कार बुधवारी मुंबईतील ताज लँडएन्ड या सेवन स्टार हॉटेलमध्ये झालेल्या फिल्मफेअर पुरस्कार वितरण सोहल्यात सोहळ्यात सूर्यवंशी यांनी स्वीकारला. या फिल्मसाठी सलग दोन वर्षे संशोधन करण्यात आले होते. याचे चित्रीकरणही कोल्हापुरात झाले आहे. कोल्हापूरच्या कला व क्रीडाविश्वासाठी ही मोठी आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे. 

काय आहे माहितीपटात? मर्दानी खेळ म्हणजे शिवकालीन युद्धकला. या युद्धकलेच्या जोरावर शिवाजी महाराजांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार केला. शिवाजी महाराजांचे मावळे मर्दानी खेळात निपुण होते. हा युद्धकलेचा वारसा जपण्यासाठी कोल्हापुरातील स्थानिक कसा प्रयत्न करत आहेत हे या माहितीपटात दाखवण्यात आले आहे. वस्तादांच्या व खेळाडूंच्या मुलाखती, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके असे या पंचवीस मिनिटांच्या माहितीपटाचे स्वरूप आहे. 

तीस लाख रुपये खर्च 

सचिन सूर्यवंशी हे काही वर्षांपासून मर्दानी खेळावर संशोधन तसेच अभ्यास करत होते. पडद्यावर भव्यदिव्य स्वरूपात दिसणारा हा माहितीपट तयार करण्यासाठी तब्बल तीस लाख इतका खर्च झाला आहे. हा माहितीपट बनवताना सचिन यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. माघार न घेता स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर त्यांनी हा माहितीपट पूर्ण केला. 

दोनवेळा फिल्मफेअर मिळवून कोल्हापूरचे नाव उंचावले 

२०१९ मध्ये सचिन सूर्यवंशी यांच्याच 'सॉकर सिटी' या माहितीपटाला फिल्मफेअर मिळाला होता. कोल्हापूरच्या या सुपुत्राने तीन वर्षात दोनवेळा फिल्मफेअर मिळवून कोल्हापूरचे नाव उंचावले आहे. आपली मुलं परदेशातील खेळात करियर करतात पण आपल्या मातीतल्या या मर्दानी खेळाला शालेय क्रीडाप्रकारात कुठलेच स्थान नाही. शासनाने या खेळाला शालेय क्रीडाप्रकारात स्थान द्यावे. फुटबॉलवेड्या कोल्हापुरात मर्दानी खेळाचे आखाडे अजूनही तग धरून आहेत. मर्दानी खेळाडू व त्यांना घडविणारे वस्ताद स्वतःच्या खिशाला झळ लावून हा खेळ ते केवळ शिवरायांवरील प्रेमापोटीच जपत आहेत. 

- सचिन सूर्यवंशी, निर्माता, कोल्हापूर. सहनिर्माते : संदीप बंडा पाटील, प्रसाद पाध्ये, सतीश सूर्यवंशी, सिद्धेश सांगावकर, चिन्मय जोशी, कविता ननवरे, कुणाल सूर्यवंशी, नरेशन : डॉ. शरद भुताडीया, संगीत : अमित पाध्ये, सिनेमॅटोग्राफी : मिनार देव, प्रशांत भिलवडे

Web Title: Documentary on Kolhapur Masculine Sports gets prestigious Filmfare award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.