चंद्रकांत पाटील यांची कागदपत्रांची जोडणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 06:04 PM2019-09-26T18:04:33+5:302019-09-26T18:06:00+5:30
ऐनवेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘निवडणूक लढवा’ असा आदेश दिल्यास धावपळ नको म्हणून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी आवश्यक कागदपत्रे जमा करण्यास सुरुवात केली आहे.
कोल्हापूर : ऐनवेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘निवडणूक लढवा’ असा आदेश दिल्यास धावपळ नको म्हणून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी आवश्यक कागदपत्रे जमा करण्यास सुरुवात केली आहे.
प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार असल्याने आणि राज्यभर प्रवास करावा लागणार असल्याने स्वत: पाटील निवडणूक लढविण्यासाठी फारसे इच्छुक नाहीत. चंदगड विधानसभा मतदारसंघातून त्यांनी लढावे, अशी तेथील भाजप नेत्यांची इच्छा आहे; तर कोल्हापूर उत्तर आणि राधानगरी मतदारसंघातूनही त्यांच्या नावाची चर्चा आहे. या सर्व गोष्टी युती होणार की नाही, यावरच अवलंबून आहेत.
तरीही अमित शहा यांनी जर पाटील यांना निवडणूक लढविण्याची सूचना केली तर ती डावलणे शक्य होणार नाही. त्यामुळेच पाटील यांच्या निकटवर्तीयांनी उमेदवारीसाठी आवश्यक ना हरकत दाखले, गुन्हा नोंद नसल्याची पत्रे घेण्याचे काम जोरात सुरू केले आहे. त्यासाठी स्वतंत्र दोन माणसे कामाला लावण्यात आली आहेत.
मिरज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
चंद्रकांत पाटील यांनी १९ सप्टेंबर २०१९ च्या पत्रानुसार मिरज पोलीस ठाण्यात आपल्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत का, याची माहिती मागविली होती. त्यानुसार मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी २४ सप्टेंबर रोजी त्यांना पत्र दिले असून त्यामध्ये या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे नमूद केले आहे.
२००९ साली ऐन गणेशोत्सवामध्ये जो जातीय तणाव निर्माण झाला होता, त्यावेळी पाटील यांच्यावर मिरज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. १५४/१९ भादंविसं १४३, १४७ ते १४९, १८६, १८८, ३३७, ३३८, ४२७, ४३५ मुंबई पोलीस अॅक्ट ३७ (१) १३५ सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रति. का. क. ३ (१)(२) (ड) ४ या कलमांखाली गुन्हा दाखल आहे.