आम्हाला कोणी शिक्षक देता का शिक्षक ! बुरंबाळी शाळेतील मुलांची आर्त हाक; वर्ग चार , शिक्षक एक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 09:50 AM2019-11-19T09:50:08+5:302019-11-19T09:51:04+5:30
तुळशी धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात असणारी ही शाळा गेल्या चार ते पाच वर्षापूर्वी तुळशी खोऱ्यातील गुणवत्तापूर्ण शाळा म्हणून नावारूपास आली होती .या शाळेतील आदर्श शिक्षक दिनकर गवळी सर यांच्या सेवानिवृत्तीनंतर मात्र या शाळेच्या गुणवत्तेला थोडी घसरन लागली .
श्रीकांत ऱ्हायकर --धामोड
राधानगरी तालुक्यातील बुरंबाळी येथील प्राथमिक शाळेत गेल्या चार वर्षापासून एकच शिक्षक कार्यरत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यानेच ग्रामस्थांसह विद्यार्थी वर्गातून जिल्हा परिषद प्रशासनाला हाक दिली जात आहे . वारंवार मागणी करूनही शाळेत शिक्षक दिला जात नसल्याने ग्रामस्थांनी बुधवारी शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे . तर दुसरीकडे विद्यार्थी वर्गातून आम्हाला कोणी शिक्षक देता का शिक्षक अशीच म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे .
बुरंबाळी येथे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग आहेत . तुळशी धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात असणारी ही शाळा गेल्या चार ते पाच वर्षापूर्वी तुळशी खोऱ्यातील गुणवत्तापूर्ण शाळा म्हणून नावारूपास आली होती .या शाळेतील आदर्श शिक्षक दिनकर गवळी सर यांच्या सेवानिवृत्तीनंतर मात्र या शाळेच्या गुणवत्तेला थोडी घसरन लागली . गवळी सरांच्या कार्य कालामध्ये या शाळेस स्वच्छ सुंदर हिरवी शाळा , उपक्रमशील शाळा असे अनेक पुरस्कार शाळेला प्राप्त झाले होते . मात्र २०१७ पासून चार वर्गासाठी केवळ एकच शिक्षक अध्यापन करीत असल्याने शाळेचा दर्जा खालावला आहे .
२० मे २०१७ पासून येथे कार्यरत असणारे श्री . सुतार हे शिक्षक प्रतिनियुक्तीवर 'डाएट ' कडे कामकाज पहात आहेत . त्यांच्या जागी एक वर्षासाठी वि. मं . शिरोली येथील शिक्षकांने प्रतिनियुक्तिवर अध्यापन केले . मात्र तेही शिक्षक पुंन्हा स्वशाळेत गेल्याने व उर्वरित एक शिक्षकांची बदली झाल्याने त्यांच्या जागी सध्या एकाच शिक्षिकेला अध्यापन ,शाळेचे दैनंदिन कामकाज , शालेय पोषण आहार , मासिक पत्रके , सातत्याने सुरु असणारी ट्रेनिंग यामुळे एका शिक्षकाला चार वर्ग सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत आहे .
याचा परिणाम म्हणून काही पालकांनी आपली मुले शेजारील शाळेमध्ये पाठवल्याने याचा परिणाम शाळेच्या पट संख्येवर झाल्याचे जाणवत आहे .पूर्वी शाळेची पटसंख्या ४२ होती मात्र सध्या ती २७ वर आली आहे . शिक्षकांना शाळेचा ढासळत चाललेला हा दर्जा व विद्यार्थ्यांची रोडावलेली पटसंख्या याचा विचार करून शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत प्रशासनाने शाळेला दुसरा शिक्षक मिळावा यासाठी ग्रा.पं.पदाधिकाऱ्यांनी तालुका व जिल्हा प्रशासन विभागाकडे शिक्षक मागणी करूनही याची कोणी दखल घेतलेली नाही .
आता येथील ग्रामपंचायतीचे सरपंच ,उपसरपंच, सदस्य यांच्यासह पालक व विद्यार्थी वर्गातून दुसऱ्या शिक्षक मागणीसाठी उठाव करण्याचे शस्त्र उपसले जात आहे . येत्या दोन दिवसात शाळेला शिक्षक न मिळाल्यास बुधवारी शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा आता विद्यार्थी वर्गातून दिला जात आहे . शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये स्वतःचा नावलौकिक टिकवून ठेवणाऱ्या राधानगरी तालुक्यातील डोंगर कपारीतील शाळांची गुणवत्तेच्या बाबतीमध्ये होणारी ही दैन्यावस्था पाहता जिल्हा व तालुका शिक्षण विभाग याकडे किंचितही लक्ष देत नाही याचे नेमके कारण काय? यावर तोडगा निघणार का? विद्यार्थ्यांना शिक्षक मिळणार का? पूर्वीप्रमाणे गुणवत्ता सिद्ध करण्याचा मान बुरंबाळी प्राथमिक शाळा मिळवणार का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने समोर येत आहेत .