काँग्रेसने भरपूर देऊनही आवाडे रडतात का?
By admin | Published: April 21, 2016 01:02 AM2016-04-21T01:02:16+5:302016-04-21T01:02:16+5:30
पी. एन. समर्थकांची विचारणा : पक्ष सोडण्याची भाषा म्हणजे ‘ब्लॅकमेलिंग’ असल्याचीही टीका
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हाच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील एखाद्या काँग्रेस नेत्याला जेवढे मिळाले नसेल एवढी सत्ता काँग्रेसने आवाडे कुटुंबीयांना दिली आहे, असे असताना पक्षाचे जिल्हाध्यक्षपद मिळाले नाही म्हणून ते रडतात का, अशी विचारणा बुधवारी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे (गोकुळ)चे संचालक पी. डी. धुंदरे, बाळासाहेब खाडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बी. एच. पाटील, काँग्रेसचे सरचिटणीस शिवाजी कवठेकर व करवीरचे माजी सभापती शहाजी पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. प्रकाश आवाडे यांची पक्ष सोडण्याची धमकी म्हणजे पदासाठी ‘ब्लॅकमेलिंग’ करण्याचा प्रयत्न असल्याचीही टीका त्यांनी केली.
जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पी. एन. पाटील व आवाडे यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. पक्षाने पी. एन. यांना प्रभारी अध्यक्षपद दिल्यावर आवाडे यांनी पक्षाबाबत वेगळा विचार करावा लागेल, अशी भूमिका घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर पी. एन. यांचे ‘खंदे समर्थक’ मानले गेलेल्या कार्यकर्त्यांनी थेट आवाडे यांच्यावरच शरसंधान केल्यामुळे काँग्रेसमधील वाद पेटणार आहे.
त्यांनी एकत्रित मांडलेली भूमिका अशी : प्रकाश आवाडे हे नऊ वर्षे मंत्री होते, त्या काळात त्यांना जिल्'ांत काँग्रेसचे नऊ कार्यकर्ते निर्माण करता आले नाहीत. अशांना पक्षाचे जिल्हाध्यक्षपद देऊन फायदा नव्हे तर पक्ष रसातळाला जाईल. दक्षिण महाराष्ट्रात सोलापूरपासून कोल्हापूरपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा असतानाही एकट्या कोल्हापूर जिल्'ांतच पी. एन. यांच्या नेतृत्वामुळे काँग्रेस बळकट राहिली आहे. जिल्हा परिषदेच्या सत्तेसह महत्त्वाच्या संस्थांची सत्ता काँग्रेसकडे आहे. स्वत: पी. एन. हे पक्षाचे सहा वर्षे सरचिटणीस, चार वर्षे उपाध्यक्ष आणि आता गेली १७ वर्षे जिल्हाध्यक्ष आहेत. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर सन १९९९ ला पक्षासाठी ठामपणे उभा राहायला कुणी तयार नसताना पी. एन. यांनी ही जबाबदारी घेतली त्यामुळे पक्षानेच त्यांना न मागता जिल्हाध्यक्षपद दिले आहे. याउलट काँग्रेसने आवाडे कुटुंबीयांना आजपर्यंत ढेकर येईल त्याहून जास्त दिले आहे. श्रीपतराव बोंद्रे, यशवंत एकनाथ पाटील आदी तत्कालीन ज्येष्ठ आमदारांना बाजूला ठेवून पक्षाने कल्लाप्पाण्णा आवाडे यांना राज्यमंत्रिपद दिले. पुढे प्रकाश आवाडे यांना नऊ वर्षे मंत्रिपद तर किशोरी आवाडे यांना सलग साडेसात वर्षे इचलकरंजीचे नगराध्यक्षपद दिले. त्यांची सूतगिरणी व साखर कारखान्यास काँग्रेसची सत्ता असतानाच भरभरून मदत झाली म्हणूनच या संस्था उभ्या राहिल्या. इचलकरंजीच्या कोणत्याही निवडणुकीत जिल्हाध्यक्ष असूनही पी. एन. यांनी कधीही ढवळाढवळ केली नाही. नगरपालिकेच्या निवडणुकीत कुणाला उमेदवारी द्यायचे हे सर्वाधिकार कायमच आवाडे घराण्याकडे दिले. त्यांनी दिलेली यादीच पी. एन. यांनी मान्य केली आहे, असे असताना जिल्हाध्यक्षपद मिळाले नाही म्हणून आवाडे यांनी पक्ष सोडण्याची भाषा करणे हे त्यांना शोभणारे नाही.’
आजच्या घडीला जिल्'ाच्या काँग्रेसमधील एकही नेता त्यांच्यासमवेत नाही. आतापर्यंत काँग्रेसचे सहा प्रदेशाध्यक्ष बदलले परंतु पी. एन. यांचे अध्यक्षपद मात्र कायम आहे यामागे त्यांची पक्षाशी असलेली निष्ठा व त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेली संधी हेच कारण आहे. याउलट आवाडे यांनी सत्ता देताना कधीही सामान्य कार्यकर्त्यांचा विचार केलेला नाही. ‘सगळे मला किंवा माझ्या घरात हवे’ अशी त्यांची वृत्ती आहे. जिल्हा परिषदेत त्यांचा एक सदस्य असतानाही त्यांना आम्ही समाजकल्याण सभापती केले. आता राज्यात व केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्या सरकारबद्दल सामान्य माणसांत रोषाची भावना बळावत आहे. त्याविरोधात सर्व काँग्रेसजणांनी एकत्रित येऊन संघटित होण्याची, संघर्ष करण्याची वेळ असताना आवाडे व्यक्तिगत स्वार्थात अडकून पडले असल्याची टीका यावेळी करण्यात आली.
सतेज यांना मदत; आवाडेंची मात्र सौदेबाजी
विधान परिषदेच्या निवडणुकीत पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याच्याच पाठीशी ठाम राहू, अशी भूमिका पी. एन. यांनी अगोदरच घेतली होती. त्यानुसार सतेज पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर पी. एन. स्वत: त्यांचा उमेदवारी अर्ज भरायला गेले. याउलट आवाडे यांनी मात्र स्वत:चा अर्ज दाखल करून सौदा करण्याचा प्रयत्न केला. सतेज पाटील यांना मी मदत केली, असे कांगावा ते करतात. सतेज पाटील यांना पी. एन. पाटील यांनीही मदत केल्यामुळेच ते विजयी झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
महाडिक यांनी घेतली आवाडेंची भेट
चर्चेबाबत गूढ : जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ
इचलकरंजी : कॉँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदासाठी डावलल्यामुळे नाराज झालेल्या माजी मंत्री प्रकाश आवाडे यांची मंगळवारी आमदार सतेज पाटील यांनी भेट घेतल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. बुधवारी सकाळी माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी अचानकपणे आवाडेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. भेटीतील चर्चा मात्र गुलदस्त्यात राहिल्याने येथील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली.
जिल्हा कॉँग्रेसच्या अध्यक्षपदी पी. एन. पाटील यांची प्रभारी म्हणून निवड झाली. त्यामुळे पक्षश्रेष्ठींकडून आवाडेंना देण्यात आलेला ‘शब्द’ फिरविला गेल्याच्या भावनेने इचलकरंजीसह हातकणंगले व शिरोळ तालुक्यांतील कॉँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले. विधान परिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या घडामोडीत प्रकाश आवाडे यांनी उमेदवारी दाखल करून बंडखोरीचा पवित्रा घेतला होता. मात्र, सतेज पाटील यांना कॉँग्रेसची अधिकृत उमेदवारी मिळताच पाटील व पक्षश्रेष्ठी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी त्या निवडणुकीतून माघार घेतली होती. तरीसुद्धा पी. एन. पाटील यांनाच जिल्हाध्यक्ष केल्याने शनिवारी निर्णय घेण्यासाठी कॉँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे.
अशा पार्श्वभूमीवर मंगळवारी सतेज पाटील यांनी आवाडेंची भेट घेतली आणि सबुरीचा सल्ला दिला. अशा घडामोडी घडल्या असतानाच बुधवारी सकाळी अचानकपणे महाडिक यांनी आवाडेंची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी प्रकाश आवाडे निवासस्थानी होते. मात्र, एका कार्यक्रमासाठी कल्लाप्पाण्णा आवाडे चिकोडी येथे गेल्यामुळे ते यावेळी नव्हते. साधारणत: अर्ध्या तासाच्या बंद खोलीत झालेल्या चर्चेनंतर महाडिक निघून गेले.
याबाबत महाडिक यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता ते म्हणाले, नगरसेवक जयवंत लायकर यांच्या मातोश्रींचे निधन झाल्यामुळे त्यांचे सांत्वन करण्यासाठी मी इचलकरंजीस आलो होतो.
येथे आल्यानंतर त्यांना भेटलेच पाहिजे, अशा भावनेने आवाडेंच्या निवासस्थानी गेलो होतो. मला कॉँग्रेसमधून निलंबित केल्यामुळे मी त्याबाबत त्यांच्याशी काहीही बोललो नाही. आवाडे खूप मोठे आहेत. त्यांचा निर्णय घेण्यासाठी ते समर्थ आहेत. त्यामुळे मला काही त्यांच्या भानगडीमध्ये भाग घ्यायचा नाही. माझी भेट ही औपचारिक होती, असेही महाडिक यांनी शेवटी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)