कुत्रे चावलेल्या रुग्णास पोलिसांकडून मारहाण
By admin | Published: January 30, 2015 12:48 AM2015-01-30T00:48:35+5:302015-01-30T00:52:31+5:30
जुना राजवाडा पोलिसांचे कृत्य : नागरिकांतून तीव्र संताप
कोल्हापूर : भवानी मंडप परिसरात हाताला कुत्र्याने चावा घेतल्याने भीतीने पोलीस ठाण्यात पळत आलेल्या रुग्णालाच पोलिसांनी बेदम मारहाण करून हाकलून लावले. काशीम खाजासाब शेख (वय ३३) असे त्याचे नाव आहे. जखमी रुग्णाला मदत करण्याऐवजी त्यालाच मारहाण करणाऱ्या पोलिसांबद्दल नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. जखमी शेख याच्यावर ‘सीपीआर’मध्ये उपचार करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी, काशीम शेख हा हातगाडीवर केळीविक्रीचा व्यवसाय करतो. तो भवानी मंडप ते शिवाजी चौक परिसरात केळी विक्रीसाठी फिरत असतो. आज, गुरुवारी दुपारी अकराच्या सुमारास तो भवानी मंडप परिसरात फिरत असताना कुत्र्याने त्याचा पाठलाग केला. कुत्र्याने त्याच्या हाताचा चावा घेतल्याने तो
भीतीने पळत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गेला.
याठिकाणी तो वेदनेने रडू लागला. त्यावर पोलिसांनी त्याची विचारपूस न करता त्याला उलट मारहाण करून तेथून हाकलून लावले. हातातून रक्तस्राव होत असलेल्या अवस्थेत तो ‘सीपीआर’मध्ये आला. याठिकाणी त्याने डॉक्टरांना आपल्याला कुत्रे चावले असून, जुना राजवाडा पोलिसांनी आपल्याला विनाकारण मारहाण केल्याचे सांगितले. या ठिकाणीही तो वेदनेने मोठमोठ्याने रडू लागला. अंगातील टी-शर्ट वर करून पोलिसांनी मारहाण केल्याचे दाखवू लागला. अखेर डॉक्टरांनी त्याची समजूत काढत उपचार करून घरी पाठवून दिले. संकटकाळी मदत करणारे पोलीसच वैरी बनल्याने ‘सीपीआर’मध्ये डॉक्टरांसह इतर रुग्ण व नातेवाईक ‘रुग्णाला कुत्रं चावले ते चावलं; पोलिसांनापण आता कुत्रं चावलंय की काय?’ अशी चर्चा करीत होते.
जबाबदारी झटकण्यासाठी रुग्णाला मारहाण करणाऱ्या पोलिसांना वरिष्ठ अधिकारी लगाम घालणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)