कुत्र्यांनी रात्रभर भुंकून गावकऱ्यांना दिली महापुराची पूर्वसूचना, पण...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 10:26 AM2019-08-20T10:26:31+5:302019-08-20T11:39:56+5:30
मुक्या प्राण्याला येणाऱ्या संकटाची चाहूल आधीच लागते, असे म्हणतात, याची प्रचिती आली ती आंबेवाडी आणि चिखली गावात महापुराचे पाणी शिरले तेव्हा. महापुरापूर्वी भुंकून गावाला संकटाची पूर्वसूचना देणाऱ्या साऱ्याच कुत्र्यांनी १0 दिवसांनी गावात प्रवेश केला. या घटनेची सोशल मीडियासह सर्वत्र चर्चा होत आहे.
संदीप आडनाईक
कोल्हापूर : मुक्या प्राण्याला येणाऱ्या संकटाची चाहूल आधीच लागते, असे म्हणतात, याची प्रचिती आली ती आंबेवाडी आणि चिखली गावात महापुराचे पाणी शिरले तेव्हा. महापुरापूर्वी भुंकून गावाला संकटाची पूर्वसूचना देणाऱ्या साऱ्याच कुत्र्यांनी १0 दिवसांनी गावात प्रवेश केला. या घटनेची सोशल मीडियासह सर्वत्र चर्चा होत आहे.
कुत्रे हे निसर्गाशी आणि माणसाशी एकरूप झालेला सस्तन प्राणी आहे. कुत्र्याचे ओरडणे अशुभ मानले जाते; परंतु अंधश्रद्धेचा भाग सोडला, तर कुत्रा हा माणसाच्या सर्वांत जवळचा आणि विश्वासू प्राणी आहे. सहावे इंद्रिय असणाऱ्या या कुत्र्यांना येणाऱ्या संकटाची चाहूल लागली, की ते सावधगिरीचा इशारा देत असतात; त्यामुळे या कुत्र्यांनी रात्रभर भुंकून एकाअर्थी ग्रामस्थांना येणाºया संकटाबद्दल पूर्वसूचनाच दिली होती.
आंबेवाडी या गावातील कुत्र्यांची सारी जमात महापुराआधी रात्रभर भुंकत होती. लोकांनी या कुत्र्यांच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष केले. त्यांच्या प्रजननाचा काळ असावा म्हणून ती ओरडत असतील, असा समज लोकांनी करून घेतला; पण महापुरानंतर याचा खुलासा साऱ्यांना झाला. सगळीच कुत्री ओरडून रात्रीच गाव सोडून सुरक्षित ठिकाणी निघून गेली होती.
ग्रामस्थ जेव्हा सकाळी उठले तेव्हा प्रत्येकाच्या घरात पाणी शिरले होते. महापूर ओसरल्यानंतर पुढच्या १0 दिवसांत ही सारीच्या सारी कुत्री गावात परत आल्यामुळे सारेचजण अचंबित झाले.
पाणी वाढू लागले, तशी गावातील सारी कुत्री कुठेतरी निघून गेली. आदल्या रात्री त्यांनी गाव भुंकून भुंकून गोळा केला होता. आता पाणी कमी झाल्यावर ही सगळी कुत्री परत गावात आसऱ्याला आली आहेत. त्यांच्यासोबत एक मांजरीही घराच्या खापऱ्यावर चढून बसली होती. नंतर ती बंगल्याच्या छतावर गेली होती, तीही परत आली आहे.
राकेश काटकर,
ग्रामस्थ, आंबेवाडी
नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना प्राणी विशेषत: जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांना मिळते; कारण त्यांची घ्राणेंद्रिये अतिशय संवेदनशील आणि तीव्र असतात. भूकंप आणि त्सुनामीवेळीही एकही प्राणी मृत झाल्याची उदाहरणे नाहीत; पंरतु या घटनेला अद्यापतरी वैज्ञानिक आधार मिळालेला नाही. हा संशोधनाचा भाग आहे.
- डॉ. मधुकर बाचुळकर,
पर्यावरण अभ्यासक, कोल्हापूर
शेपूट असणाऱ्या सर्वच प्राण्यांमध्ये निसर्गातील घडामोडी लवकर समजतात. सरडे, साप, कीटक अशा जिवांना येणाऱ्या संकटांची चाहूल आधीच लागत असते. कुत्रा हा माणसाच्या आणि निसर्गाच्याही जवळचा आहे. त्यांच्या शरीरातील मूलभूत चक्रांमुळे ही जाणीव त्यांना होत असते. हा निसर्गनियम आहे. त्यामुळेच त्यांनी इशारा दिला असेल. निसर्गाशी माणूसही एकरूप होऊ शकतो. ध्यानधारणेमुळे मनुष्याला याची जाणीव होऊ शकते. आपले सहावे इंद्रिय अशावेळी आपल्याला इशारा देत असते. फक्त आपण ते कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त असल्यामुळे समजू शकत नाही.
- डॉ. अनिल पाटील,
श्वानचिकित्सक, कोल्हापूर.