कुरुंदवाड परिसरात डॉल्बीवर बंदी
By Admin | Published: August 25, 2016 12:11 AM2016-08-25T00:11:07+5:302016-08-25T00:42:40+5:30
या आवाजाचा ध्वनी प्रदूषणाबरोबर विशेषत: लहान मुले, वृद्धांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.
कुरुंदवाड : येथील पोलिस ठाण्याने डॉल्बी विरोधात कडक भूमिका घेतली आहे. त्याची अंमलबजावणी दहीहंडीपासूनच होणार असून, डॉल्बीवर थिरकणाऱ्या तरुणाईतून नाराजी व्यक्त होत असली तरी या निर्णयाचे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
दहीहंडी, नवरात्रोत्सव, गणेशोत्सवसह विविध कार्यक्रम, उत्सव, मिरवणुकीत तरुणार्इंना डॉल्बीचे प्रमुख आकर्षण असते. संयोजक, राजकीय मंडळी तरुणांना आकर्षित करण्यासाठी डॉल्बीसह सढळ हाताने खर्च करतात. रिमिक्स व प्रमाणबह्य डॉल्बीच्या आवाजावर बेधुंद होऊन तरुणाई नाच करते. मात्र, या आवाजाचा ध्वनी प्रदूषणाबरोबर विशेषत: लहान मुले, वृद्धांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.
डॉल्बीवर व त्याच्या प्रमाणबाह्य आवाजावर शहरात बंदी घातल्याने डॉल्बी व्यावसायिकांनी आपला मोर्चा ग्रामीण भागात वळविला आहे. वेगवेगळ्या उत्सवाच्या मिरवणुकीत पोलिसही तरुणांच्या उत्साहाला प्रतिसाद देत डॉल्बी वाजवा; परंतु वाद करू नका. वाद झाल्यास कारवाई करण्यात येईल, अशी भूमिका घेतल्याने अप्रत्यक्षरीत्या मंडळांना परवानगीच दिल्याने वाद केला नसला, तरी बेफाम आवाजामुळे ग्रामीण भागातील नागरिक वैतागले आहेत.
कुरुंदवाड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी डॉल्बी विरोधात कडक भूमिका घेतली आहे.
कोणत्याही प्रकारचा डॉल्बीचा आवाज घुमणार नाही, अन् त्याची अंमलबजावणी दहीहंडीपासूनच केली जाणार आहे. त्यासाठी शहरातील मंडळाचे पदाधिकारी, राजकीय नेत्यांच्या बैठका घेऊन सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच डॉल्बी मालकांनाही सूचना केल्या असून, सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे.
आपले लक्ष ग्रामीण भागावर केंद्रित करून २७ गावांत ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालयांत पोलिस अधिकारी कदम यांनी बैठका घेऊन डॉल्बी विरोधात कारवाईचा इशारा दिल्याने तरुणाईत नाराजी आहे. (वार्ताहर)