डॉल्बीचा ठोका १०० डेसिबलवर

By admin | Published: September 30, 2015 12:27 AM2015-09-30T00:27:01+5:302015-09-30T00:36:17+5:30

‘प्रदूषण नियंत्रण’चा अहवाल : विसर्जन मिरवणुकीत कारवाईला न जुमानता ध्वनिप्रदूषण

Dolby Clock 100 Decibel | डॉल्बीचा ठोका १०० डेसिबलवर

डॉल्बीचा ठोका १०० डेसिबलवर

Next

भीमगोंडा देसाई - कोल्हापूर  गणेश विसर्जन मिरवणुकीत रविवारी शहरात डॉल्बीच्या दणदणाटाने ध्वनिप्रदूषणाच्या सर्व मर्यादा तोडल्या. या दिवशी १०१ डेसिबलवर आवाज राहिल्याने मर्यादेचे उल्लंघन झाल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. ‘प्रदूषण’ मंडळास डॉल्बी लावणाऱ्यांवर थेट कारवाईचा अधिकार नाही. त्यामुळे त्यांनी अहवाल प्रसिद्ध करून कारवाईसंबंधी ‘हात’ वर केले आहेत. परिणामी, कारवाईला न जुमानता मंडळांनी लावलेल्या डॉल्बीमुळे ध्वनिप्रदूषण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
ध्वनिप्रदूषण नियमानुसार औद्योगिक क्षेत्रात ७५, व्यापारी भागात ६५, रहिवाशी परिसरात ५५, शांतता म्हणून घोषित केलेल्या आवारात ५० डेसिबल आवाजाची मर्यादा आहे. शहरात प्रदूषण नियंत्रण मंडळाने राजारामपुरी आठव्या गल्लीत, अंबाबाई मंदिर, खासबाग मैदान या ठिकाणी ध्वनिमापक यंत्रे बसविली आहेत. ही सर्व यंत्रे औद्योगिक क्षेत्र वगळून इतर परिसरात आहेत. त्यांवर नोंदविलेल्या अहवालावरून आवाज मर्यादेचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे.
शहरात यंदा नोंदणीकृत ५७९ गणेशोत्सव मंडळांनी ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना केली होती. त्यातील मोठ्या मंडळांनी आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुकीत कानठळ्या बसतील, अशा आवाजात डॉल्बी लावला. पोलिसांसमोर डॉल्बीचा हा दणदणाट सुरूच राहिला. यंदाच्या गणेशोत्सवास महापालिका निवडणुकीची झालर असल्याने अगोदर पोलिसांकडे ‘आम्ही डॉल्बी लावणार नाही,’ अशी हमी दिलेले प्रत्यक्षात मात्र डॉल्बी लावण्यात आघाडीवर राहिले. त्यामुळे गेल्या वर्षापेक्षा अधिकच आवाज राहिला. रुग्णालये असलेल्या ठिकाणीही डॉल्बीचा आवाज कमी नव्हता, हेही अहवालावरून स्पष्ट होते.

Web Title: Dolby Clock 100 Decibel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.