कोल्हापूर क्षेत्रात डॉल्बीमुक्त गणेशोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 05:02 AM2017-08-07T05:02:28+5:302017-08-07T05:02:28+5:30
तीन-चार वर्षांतील सकारात्मक प्रतिसादामुळे यशस्वी ठरलेल्या ‘डॉल्बीमुक्त गणेशोत्सवा’ची परंपरा यंदा कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्यांत राबविण्याचा निर्धार पोलीस प्रशासनाने केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : तीन-चार वर्षांतील सकारात्मक प्रतिसादामुळे यशस्वी ठरलेल्या ‘डॉल्बीमुक्त गणेशोत्सवा’ची परंपरा यंदा कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्यांत राबविण्याचा निर्धार पोलीस प्रशासनाने केला आहे.
कोणत्याही सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांमध्ये डॉल्बी लावल्यास कठोर कारवाई करण्याचे आदेश परिक्षेत्रातील पोलीस अधीक्षकांना दिले असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी रविवारी दिली.
साताऱ्यात दोन वर्षांपूवी गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीच्या आवाजाने रस्त्याजवळील भिंत कोसळली होती. त्यात दोन गणेशभक्तांचा मृत्यू झाला होता. तर काही तरुण जखमी झाले होते. पोलिसांनी डॉल्बी चालकावर गुन्हा दाखल केला होता.
‘लोकमत’ने त्यानंतर गणेश मंडळांच्या सहकार्याने वर्षभर डॉल्बीमुक्त अभियान राबविले. तसेच पीडित कुटुंबाच्या मदतीसाठी आवाहन केल्यानंतर मोठा निधी उभा राहिला होता. त्यातून पीडितांचे पुनर्वसन करण्यास मदत झाली.
डॉल्बीचा वापर करू नये, यासाठी सर्व सार्वजनिक मंडळांच्या अध्यक्षांना नोटिसा पाठवून जनजागृती करणार आहे. गतवर्षी नियमबाह्य डॉल्बी लावणारी सार्वजनिक मंडळे, तालीम संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्यांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे, अशीही माहिती नांगरे-पाटील यांनी दिली.
आरोग्यावर दुष्परिणाम
डॉल्बीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात. आगामी गणेशोत्सवात डॉल्बीचा वापर करू नये, यासाठी सर्व सार्वजनिक मंडळांच्या अध्यक्षांना नोटिसा पाठवून जनजागृती केली जाणार आहे.