मुरगूडमध्ये डॉल्बीमुक्तीचा नारा
By Admin | Published: August 28, 2016 12:35 AM2016-08-28T00:35:28+5:302016-08-28T00:35:28+5:30
उत्स्फूर्त स्वागत : सानिका स्पोर्टस्च्या आवाहनाला प्रतिसाद देत मुरगूड विद्यालयाची प्रबोधन फेरी
मुरगूड : मुरगूड शहर व परिसरामध्ये डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुरगूडमधील सानिका स्पोर्टस्ने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील मुरगूड विद्यालय (ज्युनि. कॉलेज)च्या विद्यार्थ्यांनी शनिवारी उत्साहात डॉल्बीमुक्तीचा नारा दिला. ‘डॉल्बी टाळा, हृदयरोगाला आळा’, ‘डॉल्बीला भूलला, नोकरीला मुकला’, अशा घोषणा देत हातामध्ये लक्षवेधी फलक घेत संपूर्ण शहरातून प्रबोधन फेरी काढली. यावेळी अनेक सेवाभावी संस्था, मंडळे, व्यापारी, नागरिक यांनी या फेरीचे उत्स्फूर्त स्वागत केले.
डॉल्बीमुक्तीसाठी माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी यांनी सानिका स्पोर्टस्च्या माध्यमातून तरुण मंडळांना डॉल्बीमुक्त गणेशोत्सव करण्याचे आवाहन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी शालेय विद्यार्थ्यांची शहरातून प्रबोधन फेरी काढली. ही फेरी मुरगूड विद्यालयपासून बाजार पेठ, राजीव गांधी चौक, राणाप्रताप चौक, जवाहर रोड मार्गे एसटी स्टँड परिसर, तुकाराम चौक मार्गे पोलिस ठाण्याजवळून परत शाळेमध्ये आली.
मुरगूडचे माजी उपनगराध्यक्ष सतोषकुमार वंडकर याच्या हस्ते या प्रबोधन फेरीचे उद्घाटन झाले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रशालेचे प्राचार्य पी. व्ही. शिंदे यांनी डॉल्बीच्या वापराचे तोटे मनोगतातून सांगितले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष बजरंग सोनुले, नगरसेवक शिवाजी इंदलकर, माजी नगरसेवक मोहन कांबळे, संदीप सूर्यवंशी, उपप्राचार्य जे. डी. पाटील, उपप्राचार्य एस. पी. पाटील, पर्यवेक्षक एस. आर. पाटील, पी. बी. लोकरे, संजय सूर्यवंशी, अमित भोई, एस. आर. सुदर्शनी, पी. टी. भोसले, एम. बी. टेपुगडे, एस. एस. कळंत्रे, सुनील बोरवडेकर, विजय पाटील, अभिजित पोवार, भीमराव गुरव, आदी प्रमुख उपस्थित होते. (वार्ताहर)