‘डॉल्बीमुक्तीचा आवाज’ पोहोचेल राज्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:43 AM2017-08-28T00:43:34+5:302017-08-28T00:43:34+5:30

The 'Dolby Mukti Voice' will reach the state | ‘डॉल्बीमुक्तीचा आवाज’ पोहोचेल राज्यात

‘डॉल्बीमुक्तीचा आवाज’ पोहोचेल राज्यात

Next



समीर देशपांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘कोल्हापूरच्या बिंदू चौकातून जर एखादा संदेश दिला तर तो संपूर्ण महाराष्ट्रात जातो,’ याची जाहीर कबुली अनेक राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी याआधी अनेकदा दिली आहे. इथे टोलविरोधात आंदोलन सुरू झाले आणि त्याचा वणवा राज्यभर पसरला. शासनाला अखेर टोलचे धोरण बदलावे लागले. या पार्श्वभूमीवर ‘डॉल्बी मुक्ती’चा संदेश देण्याची संधी कोल्हापूरकरांना मिळाली आहे. ती न गमावण्यासाठी आता गणेशोत्सव मंडळांतील, तालमीतील, पेठांमधील ज्येष्ठांनी पुढाकार घेण्याची गरज
आहे.
एरव्ही कोल्हापूरकरांच्या हाकेला धावून येणाºया पोलिसांमध्ये आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये गणेश प्रतिष्ठापना मिरवणुकीवेळी ‘उभा दावा’ असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. ‘डॉल्बी लावणारच’ असा मंडळांचा हेका आणि ‘सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आम्हाला पाळावे लागतील. तेव्हा कारवाई करायला लावू नका’ अशी सुरुवातीला पोलिसांनी केलेली विनंती, असे चित्र शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत राजारामपुरीत दिसत होते.
मात्र, रात्र होईल तसे वातावरण बदलायला सुरुवात झाली. राजकीय नेतेमंडळी दाखल होऊ लागली. हजारो तरुणांच्या बाजूने निर्णय व्हावा यासाठी पोलीस अधिकाºयांसोबत चर्चा सुरू झाल्या. मात्र, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी डॉल्बीला समर्थन न देण्याचे आवाहन केले. दुसºया दिवशीच्या कार्यक्रमात तर चंद्रकांतदादांनी डॉल्बी लावल्यानंतर तो बंद करणाºया ‘जामर’चा शोध लावल्यास दहा लाखांचे बक्षीस जाहीर केले.
गेली काही वर्षे डॉल्बीमुळे पोलीस आणि कार्यकर्ते आमने-सामने येत आहेत. एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने आवाजाचे बंधन घातले आहे. त्यामुळे त्याचे उल्लंघन करण्यासाठी पोलिसांचे हात बांधले गेले आहेत. दुसरीकडे आपल्या युवा मतदारांचा विचार करत लोकप्रतिनिधीही डॉल्बीचे समर्थन करताना दिसत आहेत.
एकीकडे समाजासमोर असंख्य प्रश्न ‘आ’ वासून उभे असताना लाखोंच्या देणग्या गोळा करायच्या आणि त्याचा खर्च जर या डॉल्बीवर होणार असेल तर ते भूषणावह नाही. वेगवेगळ्या मंडळांची ईर्ष्या, त्यासाठी उभारल्या जाणाºया डॉल्बीच्या भिंती, महाद्वार रोडवर अधिक काळ थांबता यावं यासाठीचा अट्टाहास, संपूर्ण मिरवणुकीदरम्यान जवळच्या गल्ली-बोळांत जाऊन दारू पिणाºयाचं ओंगळवाणं दर्शन यामुळे ‘सार्वजनिक गणेशोत्सव’ बदनाम करण्याचं काम आम्हीच सुरू केलं आहे, याची जाणीव ठेवण्याची गरज आहे.
५ वर्षे कैद आणि १ लाख रुपये दंड
ध्वनिप्रदूषण (नियमन व नियंत्रण) सन २००० चे उल्लंघन केल्यास पर्यावरण संरक्षण अधिनियम सन १९८६ चे कलम १५ प्रमाणे ५ वर्षे कैद किंवा एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. शिक्षा होऊनही पुन्हा असे केल्यास पुढील प्रत्येक दिवसाला ५ हजार रुपये दंडाची तरतूद आहे तसेच ‘कलम १५ (१) प्रमाणे शिक्षा लागल्यानंतरच्या १ वर्षांपर्यंत असा गुन्हा केल्यास ७ वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते.
मर्यादेपेक्षा जास्त आवाजाला बंदी
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पर्यावरण संरक्षणाचा अधिनियम १९८६ व ध्वनिप्रदूषण अधिनियम २००० मधील तरतुदींचे पालन करणे अनिवार्य आहे. त्यानुसार रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत लाऊड स्पीकर, फटाके, वाद्ये वाजवण्यास बंदी आहे,तर सकाळी ६ ते रात्री १० पर्यंतसुद्धा लाऊड स्पीकर, फटाके, वाद्ये खालील मर्यादेपेक्षा जास्त आवाजात वाजविण्यास बंदी आहे.
नोकरीला अडचणी
डॉल्बीप्रकरणामध्ये जर पोलीस कारवाई झाली तर नोकरी व पासपोर्ट मिळण्यातही अडचणी निर्माण होतात. अशी अनेक उदाहरणे घडली आहेत. नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवाराला अखेरीस न्यायालयात शिक्षा झाली तर नोकरीचा राजीनामा देण्याचे हमीपत्र देऊन मग नोकरी स्वीकारावी लागली आहे. सरकारी नोकरीसाठी तर गुन्हा दाखल नसल्याचे पोलिसांचेच चारित्र्य प्रमाणपत्र सक्तीने द्यावे लागते. इथे अनेक युवकांची अडचण होण्याची शक्यता आहे. नोकºया मिळत नसताना केवळ डॉल्बीचा गुन्हा दाखल असल्याने नोकरी गमावण्याची वेळ येऊ नये, याची काळजी तरुणांनी घेण्याची गरज आहे.
आता वरिष्ठांनीच पुढे यावे
अजूनही कोल्हापूरच्या पेठांमध्ये, तालमींमध्ये ज्येष्ठ आणि प्रमुख वरिष्ठ कार्यकर्त्यांचा मान राखण्याची परंपरा आहे. डॉल्बीच्या अट्टाहासापोटी जर पोलीस कारवाई अटळ असेल तर ज्येष्ठ, वरिष्ठ कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन डॉल्बीमुक्तीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
बारा महिने या कायद्याची अंमलबजावणी हवी
आमच्याच सणावेळी असे नियम आणि कायदे तुम्हाला आठवतात का, असे विचारणाराही वर्ग आहे. पोलीस प्रशासनाला त्याला उत्तर द्यावे लागेल. सर्व सण आणि उत्सवांदरम्यान या नियम, कायद्याची अंमलबजावणी आवश्यक आहे. जेणेकरून काही सणांपुरताच हा दबाव टाकला जातो, असे वाटू नये.
विभाग कोड विभाग वर्गवारी ध्वनिमर्यादा (डेसिबलमध्ये)
दिवसा रात्री
ए औद्योगिक क्षेत्र ७५ ७०
बी विपणन, व्यावसायिक क्षेत्र ६५ ५५
सी रहिवासी क्षेत्र ५५ ४५
डी शांतता विभाग ५० ४०
येथे आपण तक्रार करू शकता
कोल्हापूर पोलीस नियंत्रण कक्ष
०२३१/२६६२३३३

Web Title: The 'Dolby Mukti Voice' will reach the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.