यंदा डॉल्बी बंद झालाच पाहिजे

By admin | Published: August 28, 2016 12:41 AM2016-08-28T00:41:26+5:302016-08-28T00:41:26+5:30

प्रदीप देशपांडे : प्रसंगी कठोर पाऊल उचला; अधिकाऱ्यांना सूचना

This dolby must be discontinued | यंदा डॉल्बी बंद झालाच पाहिजे

यंदा डॉल्बी बंद झालाच पाहिजे

Next

कोल्हापूर : डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पोलिस प्रशासन दरवर्षी मेहनत घेते; परंतु गणरायाच्या आगमनादिवशी राजारामपुरीसह काही तरुण मंडळे डॉल्बी लावून पुढे असतात. पहिल्या दिवशी डॉल्बी वाजला की, तो विसर्जन मिरवणुकीपर्यंत वाजतो. अशा मंडळांचा डॉल्बीचा आवाज पहिल्या दिवशीच रोखा, यंदा डॉल्बी बंद झालाच पाहिजे, प्रसंगी कठोर पाऊल उचला, अशा सूचना पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी शहरातील पोलिस निरीक्षकांना शनिवारी दिल्या.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक देशपांडे यांनी शनिवारी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात शहरातील पोलिस अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेतली. यावेळी गणरायाच्या आगमनादिवशी हद्दीमधील एकही तालीम किंवा मंडळ डॉल्बी लावण्याचे धाडस करणार नाही, यासाठी अहोरात्र प्रयत्न करा. वेळप्रसंगी कठोर भूमिका घ्या. कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी सतर्क राहा. गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर पावले उचला. पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवा. त्यांच्या तडीपारीचे प्रस्ताव तत्काळ पाठवून देण्याचे त्यांनी आदेश दिले.
बैठकीस शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे, पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, प्रवीण चौगुले, अनिल देशमुख, अमृत देशमुख, आदी उपस्थित होते.
राजारामपुरीतील मंडळांचे आश्वासन
दरवर्षी गणेशोत्सवात डॉल्बी लावून जल्लोष करणाऱ्या राजारामपुरीतील मंडळांनी डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार केला आहे. अष्टविनायक तरुण मंडळ, राजारामपुरी १४ वी गल्ली व ओम साई मित्र मंडळ, यादवनगर या दोन्ही मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी लेखी पत्र राजारामपुरीचे पोलिस निरीक्षक अमृत देशमुख यांना शनिवारी दिले.
संवेदनशील भागांत पोलिसांचे संचलन
गणेशोत्सवाच्या कालावधीत शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घ्या. नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी करा. बिंदू चौक, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, ताराबाई रोड, शिवाजी चौक, गंगावेश, शिवाजी पूल, टाऊन हॉल या विसर्जन मिरवणूक मार्गांसह मंगळवार पेठ, शिवाजी पेठ,, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, माळकर चौक, सीपीआर चौक,आझाद चौक, रविवार पेठ, बुधवार पेठ, अकबर मोहल्ला, घिसाड गल्ली, बागवान गल्ली, आदी संवेदनशील परिसरात शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांच्या नेतृत्वाखाली सशस्त्र संचलन करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक देशपांडे यांनी दिले.

 

Web Title: This dolby must be discontinued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.