‘डॉल्बी’ राजारामपुरीत रोखा; ‘महाद्वार’चाही मार्ग मोकळा होईल

By Admin | Published: August 26, 2016 12:53 AM2016-08-26T00:53:02+5:302016-08-26T01:12:01+5:30

पोलिसांना आव्हान : निष्पक्षपणे कारवाईची गरज

'Dolby' stays in Rajarampura; The path of 'Mahadwar' will also be freed | ‘डॉल्बी’ राजारामपुरीत रोखा; ‘महाद्वार’चाही मार्ग मोकळा होईल

‘डॉल्बी’ राजारामपुरीत रोखा; ‘महाद्वार’चाही मार्ग मोकळा होईल

googlenewsNext

सचिन पाटील -- कोल्हापूर --गणेशोत्सवाचे वेध लागले की,पोलिस प्रशासन, सामाजिक संघटनांची ‘डॉल्बीमुक्ती’साठी धावपळ सुरू होते. नेटाने ते डॉल्बीमुक्तीसाठी बैठका घेतात. प्रसंगी कारवाईही करतात. मात्र, त्यांच्या नाकावर टिच्चून विसर्जन मिरवणुकीत ‘डॉल्बी’चा ठोका वाजतोच आणि या डॉल्बीमुक्त गणेशोत्सव घोषणेचा फज्जा उडतो, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे खरंच यंदा डॉल्बीमुक्त गणेशोत्सव करावयाचा असेल तर पोलिसांनी सर्वच मंडळांना एकाच तराजूत तोलून, राजकीय दबाव झुगारुन जागेवरच कारवाई करण्याची गरज आहे आणि याची सुरुवात प्रथम राजारामपुरीतील गणेश आगमनाच्या मिरवणुकीपासूनच झाली पाहिजे.
कोल्हापूरला पारंपरिक गणेशोत्सव मिरवणुकीची मोठी परंपरा आहे. ती आजही काही मंडळांनी जपली आहे. मात्र, बदलत्या काळात डॉल्बी व मिरवणूक असे नवे समीकरण काही मंडळांनी स्वीकारले. जल्लोष साजरा करण्याच्या नावाखाली काळजाचा ठोका चुकविणारा आवाज, डोळे दीपवणारा झगमगाट, बेधुंद होऊन बीभत्सपणे नाचणारी तरुणाई असा नवा तर्क तरुणाईने करून घेतला. याचे सामाजिक व शारीरिक विपरीत परिणाम दिसू लागल्यावर डॉल्बी बंदीसाठी मोहीम तीव्र झाली. यात चांगले यशही पोलिस व सामाजिक संघटनांना आले. मात्र, कारवाईतील दुटप्पीपणा व कायद्यातील पळवाटा यामुळे ही मोहीम अद्यापही पूर्णपणे यशस्वी होताना दिसत नाही.
त्यामुळे यावर्षी खऱ्या अर्थाने डॉल्बीमुक्ती करावयाची असेल तर तरुण मंडळांत प्रबोधनाची चळवळ तीव्र करण्याबरोबरच कारवाईचा हंटरही चालविणे आवश्यक आहे. जर हे झाले तरच खऱ्या अर्थाने डॉल्बीमुक्तीचा पहिला ठोका वाजेल.
गणरायाची आगमन मिरवणूक राजारामपुरीत व विसर्जन मिरवणूक महाद्वारला हे दृश्य सध्या गणेशोत्सवात पहावयास मिळते. राजारामपुरीत दरवर्षी गणरायाचे आगमन धडाक्यात केले जाते. त्यामुळे मुख्य मार्गावर दणदणाट ऐकविण्यासाठी व झगमगाट दाखविण्यासाठी तरुण मंडळांत स्पर्धा लागलेली असते. या स्पर्धेत डॉल्बीमुक्तीचे तुणतुणे अक्षरश: फिके ठरल्याचा गेल्या दोन-तीन वर्षांतील अनुभव आहे. राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत डॉल्बीमुक्ती फाट्यावर बसवली जाते. त्यामुळे या ठिकाणी डॉल्बी वाजला तर त्याचे पडसाद पेठेतील इतर मंडळांत उमटतात. तेथे वाजतो तर विसर्जन मिरवणुकीत का नाही? या प्रश्नापुढे डॉल्बीमुक्तीचे तीन तेरा होतात. त्यामुळे पहिले मोठे आव्हान राजारामपुरीत डॉल्बीला रोखणे हे असणार आहे. तेथे ब्रेक लागला तर ‘डॉल्बी’चा दणका विसर्जन मिरवणुकीत नक्कीच फुसका ठरेल, हे उघड गुपित आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने डॉल्बीमुक्तीला बळ मिळेल.


दोन बेसची पळवाट
ंमोठ्या डॉल्बीऐवजी दोन बेस व दोन टॉप लावण्याची परवानगी म्हणजे डॉल्बीमुक्तीतील एक मोठी पळवाट आहे. कारण आज बाजारात ‘जेबीएल’सारख्या अत्याधुनिक साऊंड यंत्रणा आल्या आहेत. या केवळ दोन बेस दोन टॉपमधून मिरवणूक हादरवून टाकू शकतात. त्यांची आवाजाची मर्यादा १०० डेसिबलपेक्षा कितीतरी अधिक आहे.
गुन्ह्याचीही भीती नाही
मिरवणुकीत एखाद्या मंडळाने डॉल्बी लावला तर आवाजाची तीव्रता तपासून पोलिसांकडून नंतर गुन्हे दाखल केले जातात. मात्र, अनेक कार्यकर्ते असे गुन्हे अंगावर घ्यायला तयार असतात. काही मंडळांनी तसे कार्यकर्ते तयारच ठेवलेले असतात. मग केस पडली तर पडू दे, नंतर बघू, पण आता हलवून सोडू, अशीच मानसिकता त्यांची असते.

Web Title: 'Dolby' stays in Rajarampura; The path of 'Mahadwar' will also be freed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.