‘खंडोबा’ची डॉल्बीविरहित मिरवणूक- दोन हजार महिलांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 08:22 PM2017-09-02T20:22:40+5:302017-09-02T20:24:16+5:30
कोल्हापूर : डॉल्बीच्या दुष्परिणामाबाबत सुरूअसलेल्या जनजागृतीचा आपणही एक भाग बनावे म्हणून यंदाच्या गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणूक डॉल्बीविरहित काढण्याचा निर्णय शिवाजी पेठेतील खंडोबा तालीम मंडळाने घेतला आहे. मंगळवारी निघणाºया मिरवणुकीत परिसरातील सुमारे दोन हजार महिला एकसारख्या रंगाच्या साड्या परिधान करून सहभागी होणार आहेत. ही माहिती मंडळाचे अध्यक्ष विक्रम जरग यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितली.
खंडोबा तालीम मंडळाने २०१३ पासून साध्या पद्धतीने विसर्जन मिरवणूक काढली आहे. यंदा मंडळाची नवीन इमारत बांधल्यामुळे मंडळाच्या तरुण कार्यकर्त्यांनी डॉल्बी लावायचाच असा निर्धार करून ती २ लाख ६० हजार रुपयांना ठरविली. दरम्यान, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी डॉल्बीमुक्तीचे अभियान राबविण्यास सुरुवात केली, तर डॉल्बीमुळे होणारे परिणाम आणि बदललेले कायदे याबाबत पोलीस खात्याकडून जनजागृती सुरूकेली. स्वत: पालकमंत्री पाटील यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन डॉल्बी न लावण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून यंदाची मिरवणूक डॉल्बीविरहित काढण्याच्या निर्णय घेण्यात आला, असे जरग यांनी सांगितले.
गेल्या आठ दिवसांपासून कार्यकर्त्यांचे मत परिवर्तन करण्याचे प्रयत्न ज्येष्ठांकडून सुरूहोते. अखेर त्याला यश येऊन कार्यकर्ते तयार झाले. तरुणांचे करिअर बिघडायला नको अशी आमचीही यामागे भावना होती. डॉल्बीसाठी देणाºया रकमेत आणखी थोडी रक्कम घालून परिसरातील दोन हजार महिलांना साड्या देऊन मिरवणुकीत सहभागी करून घेण्याचे मंडळाने ठरविले आहे. एकसारख्या रंगाच्या साड्या परिधान करून महिला मिरवणुकीत अग्रभागी असतील, तसेच गणपती विसर्जन झाल्यावरच त्या घरी जाणार आहेत. महिलांच्या सहभागामुळे मिरवणुकीत शिस्त व पावित्र्य जपले जाईल, असे जरग म्हणाले.
मिरवणुकीत महालक्ष्मी प्रतिष्ठाणचे ढोल, ताशा पथक असणार असून, या पथकात १२० कलाकारांचा समावेश आहे. याशिवाय आनंदराव ठोंबरे व पंडितराव पोवार यांची मर्दानी खेळाची पथके असतील. शिवाय पन्नास मुलींचे एक लेझीम पथकही असेल. मिरवणुकीत महिलांना पिण्यासाठी पाच हजार पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले जाणार आहे.पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष सुरेश पोवार, सेके्रटरी राजेंद्र चव्हाण, खजानीस अरुण पोवार, कोंडराम साळोखे, सचिन पोवार, मनोज बालिंगकर, मधू तावडे, भरत जाधव, बबन मोरे, शेखर साळोखे, संदीप डकरे, ओंकार जोशी उपस्थित होते.
डॉल्बीचा आग्रह धुडकावला
खंडोबा तालीम काय करणार हा गेल्या काही दिवसापासून शहरात चर्चेचा विषय ठरला होता. अनेकांनी आम्हाला सांगितले की तुम्ही माघार घेऊ नका. डॉल्बीचा आग्रह कायम ठेवा. काहींनी तर आम्हाला पैसेही देऊ केले होते. आमच्या निर्णयावर अन्य मंडळांचे निर्णय ठरणार होते. मात्र, आम्ही डॉल्बी लावणार नाही याबाबत ठाम राहिलो, असे विक्रम जरग यांनी सांगितले.