घरेलू कामगारांची निदर्शने
By admin | Published: October 6, 2016 12:33 AM2016-10-06T00:33:45+5:302016-10-06T01:14:04+5:30
जिल्हाधिकारी कार्यालय : ‘महाराष्ट्र राज्य घर कामगार युनियन’तर्फे आंदोलन
कोल्हापूर : घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे घरेलू कामगारांसाठी पेन्शन योजना राबवावी, यासह विविध मागण्यांसाठी बुधवारी महाराष्ट्र राज्य घर कामगार युनियनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
दुपारी सर्व घर कामगार महिला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटल्या. या ठिकाणी घोषणाबाजी करीत तीव्र निदर्शने करण्यात आली. त्यानंतर शिष्टमंडळाने जाऊन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना मागण्यांचे निवेदन दिले.
घरेलू कामगारांची वाढती संख्या व त्यांच्या संघर्षाचा परिणाम म्हणून २०१५ मध्ये महाराष्ट्र सरकारने घर कामगारांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. आज या कल्याणकारी मंडळात किमान सव्वा दोन लाख घर कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे; परंतु घर कामगारांची नोंदणीची संख्या पाहता शासनातर्फे देण्यात येणाऱ्या योजना फारच कमी व बंदिस्त स्वरुपाच्या आहेत. कल्याणकारी मंडळ हे एक सदस्यीय मंडळ बनल्यानंतर कोणत्याही नवीन योजना अथवा लाभ घरेलू कामगारांना मिळालेला नाही. कल्याणकारी मंडळाचा ढाचा व केवळ घरेलू कामगारांसाठी योजना राबविण्यापर्यंत मर्यादित ठेवला आहे. त्यामुळे घरेलू कामगारांच्या कामगार हक्कांसाठी घर कामगारांचा लढा अजूनही चालू आहे.
पुन्हा एकदा घरेलू कामगारांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. वृद्ध घरेलू कामगार महिलांना त्यांच्या वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यावर (तमिळनाडू सरकारच्या योजनेप्रमाणे) कल्याण मंडळातर्फे पेन्शन योजना जाहीर करावी. घरेलू कामगारांना किमान वेतन व कायद्याने संरक्षण द्यावे, अन्नसुरक्षा कायदा २०१३ च्या अंतर्गत घरकामगारांची अन्नसुरक्षा सुरक्षित करावी. राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना लागू करून प्रत्येक घरेलू कामगार महिलांच्या कुटुंबीयांना त्याचा लाभ द्यावा. महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार कल्याण मंडळाची पुनर्रचना माथाडी मंडळाच्या धर्तीवर करावी, अशा मागण्यांचा यामध्ये समावेश आहे.
आंदोलनात जिल्हा समन्वयक अनुप्रिया कदम, लक्ष्मी कांबळे, अनिषा पाटील यांच्यासह महिलांचा समावेश होता.