कोल्हापुरातील अंबाबाईच्या खजिन्यात दोन कोटींचे दान, चार दिवस सुरू होती रकमेची मोजदाद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 04:05 PM2022-11-15T16:05:58+5:302022-11-15T16:06:36+5:30
दिवाळी व सुट्ट्या असल्याने पर्यटकांनी कोल्हापूर ओसंडून वाहत होते. परिणामी अंबाबाई मंदिराच्या गंगाजळीतही मोठी वाढ झाली आहे.
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या खजिन्यात सोमवारी २ कोटींची भर पडली. शारदीय नवरात्रोत्सवापासून दिवाळीपर्यंत या दीड महिन्याच्या कालावधीत मंदिराच्या आवारातील १२ दानपेट्यांमधून ही रक्कम जमा झाली आहे. गेली चार दिवस रकमेची मोजदाद सुरू होती.
कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा नवरात्रोत्सवात सर्वसामान्य परस्थ भक्तांना अंबाबाईचे दर्शन घडले. याकाळात २५ लाखांवर भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर दिवाळी व सुट्ट्या असल्याने पर्यटकांनी कोल्हापूर ओसंडून वाहत होते. परिणामी अंबाबाई मंदिराच्या गंगाजळीतही मोठी वाढ झाली आहे.
मंदिराच्या आवारातील सगळ्या पेट्या भरल्याने मागील आठवड्यात गुरुवारपासून रकमेची मोजदाद सुरू करण्यात आली, सोमवारी ही मोजणी पूर्ण झाली. आवारातील १२ पेट्यांमधून २ कोटी २८ हजार ३१३ रुपये इतक्या रकमेची भर देवीच्या खजिन्यात पडली. देवस्थान समितीला फक्त अंबाबाई मंदिरातूनच चांगले उत्पन्न मिळते. जोतिबा देवस्थानमधून मिळणाऱ्या रकमेपेक्षा खर्च जास्त आहे तर अन्य लहान मोठ्या मंदिरांपासून फारसे उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे देवस्थानचा कारभार अंबाबाई मंदिरातील उत्पन्नावरच अवलंबून आहे. यातून मंदिराचे व्यवस्थापन यासह विकासकामे केली जातात.
पेटी क्रमांक : रक्कम
१ : ४९ लाख ९६ हजार ६५३
२ : ३ लाख १३ हजार ०६४
३ : ११ लाख ८९ हजार ०३५
४ : ११ लाख ५१ हजार ५२०
५ : ४२ लाख ५६ हजार ६२३
६ : ७ लाख ९१ हजार ६१३
७ : ३२ लाख १४ हजार ७१५
८ : २ लाख ८४ हजार, ८८४
९ : ३ लाख ९१ हजार ०६९
१० : १ लाख ७७ हजार १४४
११ : १० लाख, ९० हजार ९३१
१२ : १० लाख २० हजार ६६१
एकूण : २ कोटी २८ हजार ३१३