अर्जुनवाडच्या ग्रंथालयास २ लाख ३० हजारांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:19 AM2021-06-04T04:19:06+5:302021-06-04T04:19:06+5:30
अर्जुनवाड : विनीपेग, कॅनडा येथील मराठी मंडळ ऑफ मॅनिटोबा विनीपेग, पूरग्रस्तनिधी संकलन समितीने पूरबाधित शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड येथील गुरुवर्य ...
अर्जुनवाड : विनीपेग, कॅनडा येथील मराठी मंडळ ऑफ मॅनिटोबा विनीपेग, पूरग्रस्तनिधी संकलन समितीने पूरबाधित शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड येथील गुरुवर्य नरहर बळवंत पाटील सार्वजनिक वाचनालयास विविध वस्तू स्वरूपात २ लाख ३० हजार रुपयांची मदत केली. त्यामुळे ग्रंथालयाचे चेहरामोहरा बदलला आहे. सन २०१९ च्या महापुरात ग्रंथालयाची सर्व पुस्तके, फर्निचरचे मोठे नुकसान झाले होते. त्यानुसार अत्यंत गरजेच्या असणाऱ्या वस्तूंच्या मागणीचा प्रस्ताव ग्रंथपाल राहुल मांगूरकर यांनी दिला होता. त्याची दखल घेऊन विनीपेग, कॅनडातील सदर पूरग्रस्तनिधी संकलन समितीने, मदत देण्याबद्दल सकारात्मक प्रतिसाद कळविला होता. त्यानुसार संगणक, लॅपटॉप संच, प्रिंटर, प्रोजेक्टर, साऊंड सिस्टिम, फर्निचर, पुस्तके, इनर्व्हटर, आदी वस्तू ग्रंथालयास भेट म्हणून देण्यात आल्या आहेत.
यासाठी कॅनडा स्थित श्रीहरी अर्जुनवाडकर यांनी महत्त्वाचे योगदान दिले. तसेच सोलापूरच्या ज्ञानप्रबोधिनीचे कार्यवाह प्रा. अभिजित कापरे, कॅनडातील स्वयंसेवी संस्था, महाराष्ट्र सेवा समिती ऑर्गनायझेशनचे अजित बापट व जीवन कायंदे, रवि करगुटकर तसेच प्रा. शरद पराडकर व प्रो. श्रीराम कानिटकर आदी व्यक्तींनी मदत पोहचवण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. या वेळी प्रदीप चौगुले, गजानन करे, प्रकाश तमदलगे, मारुती ढवळे, प्रकाश पाटील, बापूसो पाटील उपस्थित होते.