डॉनला ४१ वर्षे पूर्ण, कोल्हापुरातील रसिकांनी जागविल्या आठवणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 06:55 PM2019-05-15T18:55:54+5:302019-05-15T19:02:19+5:30
अमिताभ बच्चन यांच्या खऱ्या अर्थाने ‘अँग्री यंग मॅन’च्या प्रतिमेवर शिक्कामोर्तब करणाऱ्या ‘डॉन’ या सिनेमाला रविवारी ४१ वर्षे पूर्ण झाली. डायलॉग, अॅक्शन आणि गाणी यांमुळे ब्लॉकबस्टर झालेल्या या सिनेमाबद्दल काही बच्चनवेड्यांनी तर खास कोल्हापुरी स्टाईलने या आठवणी जागविल्या आहेत.
संदीप आडनाईक
कोल्हापूर : अमिताभ बच्चन यांच्या खऱ्या अर्थाने ‘अँग्री यंग मॅन’च्या प्रतिमेवर शिक्कामोर्तब करणाऱ्या ‘डॉन’ या सिनेमाला रविवारी ४१ वर्षे पूर्ण झाली. डायलॉग, अॅक्शन आणि गाणी यांमुळे ब्लॉकबस्टर झालेल्या या सिनेमाबद्दल काही बच्चनवेड्यांनी तर खास कोल्हापुरी स्टाईलने या आठवणी जागविल्या आहेत.
काहीही झालं तरी बच्चन यांच्या सिनेमाचा पहिल्या दिवशी पहिला खेळ बघायचाच हा नियम असलेले कलाशिक्षक आणि ‘चिल्लर पार्टी’चे मिलिंद यादव हे तर ‘डॉन’ सिनेमातील पोलीस पाठलाग करताना धावणाऱ्या अमिताभचे प्रसिद्ध पोस्टर तेव्हाच्या तरुणाईच्या शर्टवर चितारून देत. ‘डॉन’प्रमाणे पान खाऊन घरी आल्यानंतर वडिलांकडून श्रीमुखातही खावी लागल्याची आठवण त्यांनी सांगितली.
‘डॉन’ पिक्चरला ४१ वर्षे पूर्ण झाली. त्यावेळेस मुंबईतील एका थिएटरमध्ये अॅडव्हाॅन्स बुकिंगला झालेली गर्दी. विशेष म्हणजे याच थीएटरला अमिताभ आराधनाच्या तिकीटासाठी उभा होता, पण तिकीट मिळाले नाही,शेवटी त्याच पैशात त्याने वडा पाव खरेदी केला होता.
आता पुण्यात एका कंपनीत मॅनेजरच्या हुद्द्यावर असलेल्या उमेश कुलकर्णी यांनीही ‘डॉन’ सिनेमा मित्रांसमवेत पाहिल्याची आठवण सांगितली. बच्चनचा सिनेमा म्हटले की फर्स्ट डे, फर्स्ट शो पाहणारे कोल्हापूरचे हेमंत पाटील आता महावीर महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक आहेत. पोलीस असलेल्या वडिलांना बच्चन आवडत. त्यामुळे वयाच्या आठव्या वर्षी पुण्यात देहू रोडला डिफेन्स थिएटरमध्ये प्रथमत: बच्चनचा ‘डॉन’ सिनेमा दाखविला आणि आजअखेर ते बच्चनचा एकही सिनेमा सोडत नाहीत.
मूळचे किणी गावचे दौलत हवालदार यांनीही कॉलेज बंक करून कोल्हापुरात डॉन पाहिल्याची आठवण सांगितली. ते सध्या गोव्यात सांस्कृतिक खात्यात काम करतात. ‘डॉन’चा संपूर्ण आयुष्यावर प्रभाव असणारेही काही कमी नाहीत. राजारामपुरीतील माउली पुतळ्याजवळ राहणारी रमेश नावाची व्यक्ती तर मृत्यूपर्यंत ‘रमेश डॉन’ म्हणून प्रसिद्ध होती. ‘लोकमत’चे छायाचित्रकार नसीर अत्तारही बच्चन यांचे जबरदस्त वेडे. मित्रांसमवेत रांगेत घुसून तिकीट काढून हा सिनेमा पाहिल्याची आठवण त्यांनी सांगितली.
फिर भी ‘डॉन’ आखीर ‘डॉन’ है
‘डॉन’ने रिलीज व्हायच्या आधीच दोन महिने माझ्या आयुष्यात प्रवेश केला होता. सिनेमात मूळ ‘डॉन’ हा फक्त १० ते १५ मिनिटांपुरताच आहे. पोलिसांचा पाठलाग चुकवतानाच्या दृश्यातील पिवळ्या शर्टवर घातलेले, पांढऱ्या ठिपक्या ठिपक्या असलेले काळे जाकीट, जीवाच्या आकांताने पळणाऱ्या डॉनचे पोस्टर तरुण वर्गात इतके लोकप्रिय झाले, की ती फॅशन तर आलीच; पण शर्टवर हाताने ते चित्र रंगवून मुलं मिरवू लागली. सहा महिने शर्टच्या खिशावर हे चित्र काढून घ्यायला माझ्याकडे रोज पोरं यायची.
दोन रुपयाला एक चित्र. तीन-चार महिने ‘डॉन’ मी याच पैशातून पाहिला. आजही डॉनची नशा तशीच आहे. आजूबाजूच्या वाईटावर प्रहार करावा, असे तेव्हा वाटायचे; पण बळ नव्हते. ती सुप्त इच्छा पडद्यावर बच्चनने पूर्ण केली. डॉनमुळे वडिलांची एक कानफाटीतही खाल्ली होती. सलग आठ-दहावेळा डॉन पाहिल्यावर, तोंड लाल होईतोपर्यंत पान खायचं ठरलं आणि पान खाऊन घरी आलो. घरी आल्यावर तोंड बाहेरूनही लाल झाले होते. तो काळ म्हणजे पानाकडेसुद्धा वाईट व्यसन म्हणून पाहिलं जायचं. वडिलांनी कानफाटीत दिली खरी; पण मी मनातल्या मनांत म्हटलं, ‘इन्स्पेक्टरसाब कानफाडीत पडी तो क्या हुवा, फिर भी डॉन आखीर डॉन है।’
दहावीच्या पूर्वपरीक्षेला लिहिली चक्क सिनेमाची स्टोरी
बच्चनवेडे ग्रुपमध्ये व्हाईस अॅडमिन असलेले राजू नांद्रे यांनीही १0 वर्षांचे असताना ‘डॉन’ पाहिल्याची आठवण सांगितली. राजू नांद्रे यांचे मित्र असलेले वेताळमाळ येथे राहणारे संजय जगताप यांच्यावर डॉनचा तर इतका प्रभाव होता, की १९७९ मध्ये दहावीच्या पूर्वपरीक्षेला त्यांनी कलाशिक्षक आणि चळवळीतील कार्यकर्ते असलेल्या एका विषयात डॉनची स्टोरी लिहिली होती. अर्थात महाराष्ट्र हायस्कूलचे तत्कालीन मुख्याध्यापक डी. बी. पाटील यांच्याकडून नंतर त्यांना कानफाटीत खावी लागली, हा भाग वेगळा. आज जगताप यांचे एस. एम. लोहिया हायस्कूलसमोर आइस्क्रीमचे दुकान आहे.