श्रेयवाद नको, कोल्हापूरची हद्दवाढ करा; गेल्या तीस-पस्तीस वर्षांपासून प्रश्न प्रलंबित 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 03:40 PM2023-09-16T15:40:21+5:302023-09-16T15:40:45+5:30

कोणाच्याही कोंबड्याने सूर्य उगवू दे; पण एकदा हद्दवाढ होऊ दे

Don't be a creditor, expand the boundaries of Kolhapur | श्रेयवाद नको, कोल्हापूरची हद्दवाढ करा; गेल्या तीस-पस्तीस वर्षांपासून प्रश्न प्रलंबित 

श्रेयवाद नको, कोल्हापूरची हद्दवाढ करा; गेल्या तीस-पस्तीस वर्षांपासून प्रश्न प्रलंबित 

googlenewsNext

कोल्हापूर : गेल्या तीस-पस्तीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न निकाली काढण्याचे प्रयत्न राज्य सरकारच्या पातळीवर सुरू असताना दुसरीकडे स्थानिक राजकारणातील कुरघोडीतून श्रेयवादाचा प्रश्न निर्माण करून हद्दवाढीला ‘खो’ घातला जात आहे की काय? अशी शंका व्यक्त होऊ लागली आहे. कोणाच्याही कोंबड्याने सूर्य उगवू दे; पण एकदा हद्दवाढ होऊ दे, त्याला श्रेयवादातून वेगळे वळण देण्याचा प्रयत्न होऊ नये, अशी शहरवासीयांची अपेक्षा आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहराच्या हद्दवाढीबाबत सकारात्मक भूमिका स्पष्ट करुन कोल्हापूरकरांना एकोपा करण्याचे आवाहन केले होते. पालकमंत्री दीपक केसरकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हद्दवाढीसाठी आग्रही आहेत. मंत्रालयात याबाबतीत अधिकारी आणि मंत्री पातळीवर चर्चा होत आहेत. गेल्याच आठवड्यात पालकमंत्री केसरकर यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मुंबईत बोलावून घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. एकंदरीत सकारात्मक हालचाली सुरू आहेत.

तपोवन मैदानावर झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री पवार यांनी हद्दवाढ का झाली पाहिजे, योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावे लागतात, असे सांगत हद्दवाढीचे समर्थन केले होते. त्याच्या आधीपासून पालकमंत्री याबाबतीत चर्चा करीत आहेत. राजेश क्षीरसागर तर अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत आहेत. आमदार जयश्री जाधव यांनीसुद्धा विधानसभेत याबाबत चर्चा घडवून आणली होती. हद्दवाढीची आग्रही मागणी केली आहे. आजही त्या आग्रही आहेत.

केवळ सत्तेत असणारे मंत्री, आमदार तसेच विरोधात असणारे आमदार हद्दवाढीची मागणी करीत नाहीत तर येथील विविध राजकीय पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या कृती समितीचे पदाधिकाही मागणी करीत आहेत. विविध संस्थांनीही स्वतंत्रपणे मागणी करणे सुरूच ठेवले आहे. कोणी एक व्यक्ती, आमदार, मंत्री प्रयत्न करीत नाहीत तर सर्वच जण वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करीत आहेत. याची दखल घेत राज्य सरकार सकारात्मक दृष्टीने विचार करून सात-आठ गावांचा समावेश करायचा आणि हद्दवाढीचा विषय संपवायचा अशा प्रयत्नात असताना त्याला वेगळे वळण देण्याचाही प्रयत्न सुरू झाला आहे.

कोणाच्याही कोंबड्याने सूर्य उगवू दे; पण एकदा या शहराची हद्दवाढ हाेऊ दे, अशीच अपेक्षा शहरवासीयांची आहे. कोल्हापूरला संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही आणि आता इतक्या वर्षांच्या प्रयत्नांनंतर मागणी मान्य होणार असेल तर एकमेकांवर निशाणा साधणे अयोग्य असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.


वादाच्या गोष्टी बाजूला ठेवून हद्दवाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. वाद घालत बसण्यापेक्षा चला आम्हीसुद्धा तुमच्या मदतीला येतो, असे म्हणण्याची भूमिका सर्वांनी घ्यावी. जर वाद घालत बसलो तर सरकार आधी तुमचे वाद मिटवा, असे म्हणेल. त्यामुळे सर्वांनी शहाणपणाची भूमिका घ्यावी. - बाबा इंदुलकर, हद्दवाढ कृती समिती.

Web Title: Don't be a creditor, expand the boundaries of Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.