घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 11:39 AM2024-11-27T11:39:12+5:302024-11-27T11:48:33+5:30

Samarjeet Ghatge : 'टायगर अभी जिंदा है' या शब्दांत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते समरजित घाटगे यांनी कार्यकर्त्यांना दिलासा दिला. 

Don't be afraid, 'Tiger Abhi Zinda Hai', Samarjeet Ghatge's relief to activists in gadhinglaj kolhapur | घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा

घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा

गडहिंग्लज : हुकूमशाही व भ्रष्टाचारी कारभाराच्या विरोधातील आपली लढाई यापुढेही चालूच राहील. जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आपण झटत राहू. पराभवाने सगळे संपत नाही. त्यामुळे घाबरू नका, माझ्यासह महाविकास आघाडीचे सर्व नेतेमंडळी आपल्या सर्वांच्या पाठीशी आहेत. 'टायगर अभी जिंदा है' या शब्दांत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते समरजित घाटगे यांनी कार्यकर्त्यांना दिलासा दिला. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉलमध्ये मंगळवारी (दि.२६) आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत समरजित घाटगे बोलत होते. माझ्या पराभवामुळे खचून जावू नका, परिवर्तनाच्या लढाईसाठी पुन्हा जोमाने कामाला लागा, असे आवाहन त्यांनी केले. जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरी म्हणाल्या, समरजित घाटगे यांचा निसटता पराभव जिव्हारी लागणारा आहे. मात्र, सव्वा लाखाहून अधिक मतदारांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास भविष्यासाठी प्रेरणादायी आहे. 

याप्रसंगी शिवाजीराव खोत, रियाज शमनजी, बसवराज आजरी यांनीही मनोगत व्यक्त केले. तसेच, यावेळी नवोदिता घाटगे, सुनील शिंत्रे, महेश कोरी, दिग्विजय कुराडे, गणपतराव डोंगरे, दिलीप माने, रामदास कुराडे, श्रीपती कदम, बाबासो पाटील, मन्सूर मुल्ला, परमेश्वरी पाटील, अजित खोत आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. प्रा. रमेश पाटील यांनी स्वागत केले.

मतदार, कार्यकर्त्यांचे आभार..! 
समरजित घाटगे यांनी निवडणुकीच्या निकालानंतर तातडीने गडहिंग्लज शहर व कडगाव-कौलगे जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांची भेट घेऊन संवाद साधला आणि उत्स्फूर्तपणे दिलेल्या पाठबळाबद्दल मतदार व कार्यकर्त्यांचे आभारही मानले.

समरजित घाटगे यांचा ११ हजार ५८१ मतांनी पराभव 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार समरजित घाटगे यांचा ११ हजार ५८१ मतांनी पराभव केला. मंत्री मुश्रीफ यांचा हा सलग सहावा विजय असून त्यांनी डबल हॅटट्रिक केली आहे. मुश्रीफ यांना १ लाख ४५ हजार २६९, तर समरजित घाटगे यांना १ लाख ३३ हजार ६८८ मते मिळाली.

Web Title: Don't be afraid, 'Tiger Abhi Zinda Hai', Samarjeet Ghatge's relief to activists in gadhinglaj kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.