corona virus-कोरोनाला घाबरू नका, काळजी घ्या : दौलत देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 03:43 PM2020-03-06T15:43:01+5:302020-03-06T15:45:26+5:30
कोरोनाला घाबरू नका, काळजी घ्या, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे. कोरोनासंदर्भात आरोग्य विभागाशी निगडित अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
कोल्हापूर : कोरोनाला घाबरू नका, काळजी घ्या, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे. कोरोनासंदर्भात आरोग्य विभागाशी निगडित अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले, कोरोना व्हायरसबाबत अनाठायी भीती बाळगण्याची गरज नाही. मात्र, सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे. हा आजार बरा होणारा असून या संदर्भात अफवा पसरवू नयेत. सर्दी, खोकला झाल्यास तत्काळ रुग्णालयात जावे. अशा रुग्णांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
सरकारी रुग्णालयांना कोरोनासंदर्भात स्वतंत्र आयसोलेशन कक्ष सज्ज ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. वेळप्रसंगी खासगी रुग्णालयामध्येही अशा प्रकारचे कक्ष करण्याचे आदेश दिले जाणार आहेत. तसेच या आजारासंदर्भात जनजागृती करण्याचे सूचना संबंधितांना दिल्या असून जिल्हा, ग्रामीण रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड करण्यात आले आहेत.
यावेळी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमन मित्तल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. डी. केम्पीपाटील, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये हे मान्यवर उपस्थित होते.
आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवा : मुख्य सचिव अजोय मेहता
राज्य शासनाचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त यांच्याशी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महापालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी उपस्थित होते.
राज्यात सध्या तरी कोरोनाचे रुग्ण नाहीत. मात्र, खबरदारी म्हणून पूर्वतयारी करावी. आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवा, अशा सूचना मेहता यांनी केल्या. वैयक्तिक पातळीवर स्वच्छता राखावी. सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असल्यास तत्काळ रुग्णालयामध्ये उपचार घ्यावा. गर्दीच्या ठिकाणी वावरणे टाळावे, असे आवाहन नागरिकांना करण्याच्या सूचनाही मेहता यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
परदेशांतून येणाऱ्याकडूनच कोरोनाचा धोका
कोल्हापूरसह राज्यात अद्यापही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. केवळ परदेशांतून येणाऱ्याकडूनच कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. तरीही कोल्हापुरातील सर्व आरोग्य विभागांना यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.