अफवांवर विश्वास ठेऊ नका, पन्हाळ्याची शासकीय कार्यालये कुठेही जाणार नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:47 PM2021-08-02T16:47:32+5:302021-08-02T16:51:54+5:30
Fort Panhala Flood Kolhapur : पन्हाळा शहरात संपुर्ण तालुक्याची सर्व कार्यालये आहेत. रस्ता खचला म्हणुन ही कार्यालये वाघबिळ येथे हलविण्याची मागणी होत असली तरी अशी कार्यालये बाहेर नेता येत नाहीत, त्याला राज्य शासनाची परवानगी लागते अशी माहिती तहसीलदार रमेश शेंडगे यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.
नितीन भगवान
पन्हाळा : पन्हाळा शहरात संपुर्ण तालुक्याची सर्व कार्यालये आहेत. रस्ता खचला म्हणुन ही कार्यालये वाघबिळ येथे हलविण्याची मागणी होत असली तरी अशी कार्यालये बाहेर नेता येत नाहीत, त्याला राज्य शासनाची परवानगी लागते अशी माहिती तहसीलदार रमेश शेंडगे यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे काम सुरु केल्याने पुढील दोन ते तीन महिन्यात पन्हाळ्यावरील सर्व व्यव्हार सुरु होतील असे नगराध्यक्षा रुपाली धडेल यांनी सांगितले.
२३ जुलै रोजी पन्हाळ्याचा रस्ता खचला. त्यामुळे पन्हाळकर तर अडकलेच परंतु अनेक शासकीय कार्यालये बंद राहिली. त्यामुळे पन्हाळ्याच्या बाहेरून येणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना कामावर येता न आल्याने शासकीय कामकाजहि बंद राहिले.
दरम्यान, पन्हाळ्यावर अशा प्रकारचे रस्ता संकट वारंवार घडु लागल्याने आता शासकिय कार्यालये वाघबिळ येथे जाणार, अशी अफवा पसरली आहे. मात्र या बाबत माजी आमदार सत्यजित पाटील यांनी या प्रकाराला आपला विरोध दर्शविला.
असा प्रकार जाणीवपूर्वक कोणी करत असतील तर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगुन ही कृती हाणुन पाडेन. यापेक्षा पन्हाळ्यावर येण्या- जाण्यासाठी प्रस्तावित उड्डाण पुल लवकरात लवकर कोणत्या पद्धतीने पुर्ण होइल यासाठी सातत्याने मुख्यमंत्री कार्यालयाशी पाठपुरावा करत असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
शासकिय कार्यालये इतरत्र हलविण्यास गावकऱ्यांचा विरोध असुन असे कांही होत असल्यास आपण न्यायालयीन दाद मागु असा इशारा माजी नगरसेवक सतीश भोसले यांनी दिला आहे.
खरतर पन्हाळा शहराने इतिहास काळापासुन राजधानीचे वैभव पाहिले आहे. यात भोजराजापासुन छत्रपती ताराराणीपर्यंत या ठिकाणी सर्व कार्यालये होती, ती तशीच पुढे चालु आहेत. रस्त्याचा प्रश्न हा तात्पुरता आहे, यामुळे शासकिय कार्यालये पन्हाळा शहरातुन बाहेर जावीत असे कुणाच्या मनात नसताना ही अफवा उठवण्याचा नतद्रष्ट मंडळींचा कोणता हेतु आहे, हे समजुन येत नाही.
पन्हाळ्यावरील रस्त्याचे काम सुरु
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे काम सुरु झाले आहे. पुढील दोन ते तीन महिन्यात पन्हाळ्यावरील सर्व व्यव्हार सुरु होतील असे नगराध्यक्षा रुपाली धडेल यांनी सांगितले.