थकबाकीदारांची वीज खंडीत करु नका, बिलासाठी हफ्ते पाडून द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 07:08 PM2021-07-15T19:08:59+5:302021-07-15T19:10:48+5:30
Mahavitran Kolhapur : कोरोना आणि सरकारच्या निर्बंधामुळे व्यापार ठप्प आहे, ग्राहकांची वीज बिल भरण्याची ऐपत राहिलेली नाही, परिस्थिती पुर्वपदावर आल्यावर बिले भरली जातील, तोपर्यंत थकबाकीदारांचा वीज पुरवठा अजिबात खंडीत करु नका, महावितरणने संयमाने घ्यावे, वसूली कर्मचाऱ्यांची अरेरावी थांबवावी, हफ्ते पाडून द्यावेत अशा सुचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी गुरुवारी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या. याला महावितरण अधिकाऱ्यांनी सहमती दर्शवली.
कोल्हापूर: कोरोना आणि सरकारच्या निर्बंधामुळे व्यापार ठप्प आहे, ग्राहकांची वीज बिल भरण्याची ऐपत राहिलेली नाही, परिस्थिती पुर्वपदावर आल्यावर बिले भरली जातील, तोपर्यंत थकबाकीदारांचा वीज पुरवठा अजिबात खंडीत करु नका, महावितरणने संयमाने घ्यावे, वसूली कर्मचाऱ्यांची अरेरावी थांबवावी, हफ्ते पाडून द्यावेत अशा सुचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी गुरुवारी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या. याला महावितरण अधिकाऱ्यांनी सहमती दर्शवली.
थकीत बिलांच्या वसूलीची मोहीम महावितरणने तीव्र करत वीज कनेक्शन तोडण्यास सुरुवात केल्याने ग्राहकांमध्ये विशेषता उद्योजकांमध्ये तीव्र असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी महावितरणच्याउपविभागीय कार्यालयात बैठक घेतली.
आमदार जाधव यांनी महावितरणने सहकार्याची भूमिका घेण्याचे आवाहन केले, याला प्रतिसाद देत ग्राहकांशी सौजन्याने बोलण्याच्या सुचना सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात येतील, बिलाबाबत कांही तक्रारी असल्यास विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा, बिलाची रक्कम जास्त असल्यास हफ्ते पाडून देण्यात येतील असे कार्यकारी अभियंता एन.आर.गांधले यांनी सांगितले.
अधिक्षक अभियंता अंकूर कावळे यांनी वसूलीसाठी कर्मचारी अपुरे असल्याने ताण येत असून यात अरेरावी घडली असेल, पण येथून पुढे होणार नाही याची खबरदारी घेऊ असे सांगितले. यावेळी मॅकचे उपाध्यक्ष संजय पेंडसे, दिपक चोरगे, अजित कोठारी, शिवाजीराव पवार, प्रशांत शिंदे, संपत पाटील, राहुल नष्टे, तेजस धडाम आदी उपस्थित होते.
हे बरोबर नाही
राज्यात वीज बील वसूलीचे प्रमाण कोल्हापुरात सर्वात चांगले असून, वीज गळती शुन्य आहे. गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे सर्वांचेचे अर्थकारण बिघडले आहे. घर कसे चालवायचे अशा विवेचंनेत असलेल्या नागरिकांना वीज वितरण कंपनीने शॉक देत आहे.
वितरण कंपनी व ग्राहक यांचे नाते कायमस्वरूपीचे आहे. त्यामुळे कोरोनाच्या परिस्थितीमध्ये ग्राहकांशी थेट संवाद साधून चर्चेतून वीज बिलाची वसुली करता येते ; मात्र वितरण कंपनीच्या काही कर्मचाऱ्याची भाषा अरेरावीची आहे, हे बरोबर नाही, अशा शब्दात आमदार जाधव यांनी महावितरणच्या कारभारावर ताशेरे ओढले
यांनी केली तक्रार
संजय शेटे,अध्यक्ष चेंबर्स ऑफ कॉमर्स : दुकानाच्या सुरक्षीततेसाठी सिसिटीव्ही कॅमेरा व अलार्म व्यापाऱ्यांनी सुरु केलेत. पूर्व सूचना न देता दुकानाचा वीज पुरवठा खंडीत केल्यामुळे व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे
श्रीकांत पोतनीस,गोेशीमा अध्यक्ष : सोमवारी एमआयडीसी बंद असतानाही उद्योगाचा विज पुरवठा खंडीत केला जात आहे.
अतुल पाटील, स्मॅक अध्यक्ष: विज बील भरण्यासाठी हफ्ते योजना पुन्हा सुरू करावी व उद्योजकांच्या समस्याबाबत व्हिडीओ कॉन्फरन्स घ्यावी.