राजकीय धुणीभांडीसाठी ‘गोकुळ’ची बदनामी नको; आरोपामुळे ‘अमूल’ला मिळते बळ

By राजाराम लोंढे | Published: September 19, 2023 06:15 PM2023-09-19T18:15:30+5:302023-09-19T18:16:42+5:30

‘केडीसीसी’मधील समझोता ‘गोकुळ’मध्ये काही नाही?

Don't defame Gokul Dudh Sangh in political accusations | राजकीय धुणीभांडीसाठी ‘गोकुळ’ची बदनामी नको; आरोपामुळे ‘अमूल’ला मिळते बळ

राजकीय धुणीभांडीसाठी ‘गोकुळ’ची बदनामी नको; आरोपामुळे ‘अमूल’ला मिळते बळ

googlenewsNext

राजाराम लोंढे 

कोल्हापूर : साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या घरी दोन वेळची चुली पेटत आहे, ते ‘गोकुळ’मुळेच, हे कोणीही नाकारू शकत नाही. मात्र, राजकीय धुणीभांडी करण्यासाठी संघाचा वापर सुरू झाल्याने ‘गोकुळ’ची बदनामी तर होतेच, त्याचबरोबर शेणामुतात राबून कसदार दूध घालून निर्माण झालेला ‘ब्रॅन्ड’ही धोक्यात आला आहे. सभा म्हणजे हुर्रेबाजी, एकमेकांचा राजकीय सूड घेण्याची संधी, असे समीकरण झाले असून यामध्ये सभासदांचे हित किती? संघासमोरील आव्हानांवर चर्चा होण्यापेक्षा आडवा आणि जिरवा ही वृत्ती दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने घातक आहे.

कोल्हापूरच्याराजकारणात माजी आमदार महादेवराव महाडिक व आमदार सतेज पाटील यांच्यातील राजकारणाने टोक गाठले आहे. दोन्ही गट शड्डू ठोकून बिंदू चौकापर्यंत आले, अगदी त्याच पद्धतीने गोकुळच्या राजकारणात सुद्धा टोक गाठले गेले आहे. सत्तारूढ गटाच्या समर्थकांचा अतिउत्साह इतका होता, सभा सुरू होण्यापूर्वीच नेत्यांच्या विजयाच्या घोषणा देऊन वातावरण तापवले. नेत्यांच्या समोर हुल्लडबाजी सुरू असताना एकानेही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. सभेला आलेले सगळेच दोन्ही गटाचे समर्थक नव्हते, त्यातील काही सुज्ञ सभासद होते, त्यांच्या मनातील दूध उत्पादकांच्या हिताचे काही प्रश्न होते, मात्र त्यांच्याकडे बघण्यास कोणालाही वेळ नाही. प्रास्ताविक, श्रद्धांजली, पत्रिकेवरील विषयांचे वाचन आणि गोंधळातच आभार हे ‘गोकुळ’च्या सभेचे समीकरण बदलले पाहिजे. ‘गोकुळ’चा वापर राजकारणाचा अड्डा होत गेल्यास ‘अमूल’ला ताकद मिळेल आणि ‘गोकुळ’ कधी भुईसपाट झाले हेच कळणार नाही, त्यामुळे सहकार रुजवलेल्या पंढरीत चूल पेटवत न्यायची की राजकारणाने चुलीत पाणी ओतायचे? याचा विचार सत्ताधारी आणि विरोधकांनी करण्याची गरज आहे.

राजकीय लढाईचे मैदान वेगळे

‘गोकुळ’चे नाव देशभर पोहचवण्यासाठी दूध उत्पादकांचे कष्ट आहेतच, त्याचबरोबर स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर, अरुण नरके आदी नेत्यांची दूरदृष्टीही कारणीभूत आहे. राजकीय मतभेद असू शकतात, पण त्यासाठीची मैदाने वेगळी आहेत. नेत्यांनी तिथे एकमेकांविरोधात शड्डू ठोकून ताकद अजमावावी, ही शेतकऱ्यांची इच्छा आहे.

‘केडीसीसी’मधील समझोता ‘गोकुळ’मध्ये काही नाही?

‘केडीसीसी’ बँक व ‘गोकुळ’ या जिल्ह्याच्या अर्थवाहिन्या आहेत. ‘केडीसीसी’ बँकेत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी समझोत्याचे राजकारण केले, येथे निवडणूक झाली, विरोधात तीन संचालक निवडूनही आले. मात्र, निवडणुकीबरोबर ईर्षाही संपली. मग हाच समझोता ‘गोकुळ’मध्ये का होत नाही? ‘केडीसीसी’ काचेचे भांडे असले तरी ‘गोकुळ’ त्या भांड्यातील दूध आहे. वेळीच काळजी घेतली नाहीतर हे दूध नासण्यास वेळ लागणार नाही, हे मात्र निश्चित आहे.

हुर्रे करणारे शेणामुतात राबतात का?

मागील पाच वर्षात आणि आता दोन्ही बाजूने हुर्रे करणाऱ्यांची भूमिका फक्त बदलली आहे. शुक्रवारच्या सभेत दोन्ही बाजूने हुर्रे करणारे किती जण शेणामुतात राबतात? दूध वाढीसाठी त्यांचे योगदान काय? हे विचारण्याची वेळ आली आहे. नेत्यांची खुशमस्करी करण्यासाठी गोंधळाचे प्रकार वाढले आहेत.

Web Title: Don't defame Gokul Dudh Sangh in political accusations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.