"ग्लॅमर, झगमगाटाला भुलून पोलीस खात्यात येऊ नका"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 04:25 AM2021-04-05T04:25:47+5:302021-04-05T04:26:05+5:30
प्रशिक्षणार्थी पीएसआय तुकडीत राज्यात पहिली आलेल्या शुभांगी शिरगावे हिच्याशी संवाद
- नसीम सनदी
कोल्हापूर : शुभांगी शिरगावे ही अब्दुललाट (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) येथील शेतकरी मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी. प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या तुकडीत राज्यात पहिली आली. महाराष्ट्र पोलीस अकॅडमीकडून बेस्ट कॅडेट म्हणून दिला जाणाऱ्या ‘रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनर’ची मानकरी शुभांगी शिरगावे यांच्याशी साधलेला हा थेट संवाद.
प्रश्न : पोलीस क्षेत्रात का जावे वाटले?
उत्तर : पोलीस व्हायचे असे काही ठरविले नव्हते; पण खाकी वर्दीची प्रचंड क्रेझ वाटायची. सुदैवाने माझी उंची व शारीरिक क्षमता चांगली असल्याने पदवीनंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. पासही झाले. मग पुढे आत्मविश्वास वाढत गेला आणि पुन्हा एकदा परीक्षा देत राज्यात मुलींमध्ये पहिली आले.
प्रश्न : ट्रेनिंग घेतानाचे काय अनुभव होते?
उत्तर : नाशिकमधील पोलीस अकॅडमीमध्ये १५ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. प्रशिक्षणाचा काळ शारीरिक आणि मानसिक कसोटीची परीक्षा पाहणारा असतो. नेहमी १२ महिन्यांचे असणारे हे ट्रेनिंग कोरोनामुळे आम्हाला १५ महिने करावे लागले. हा काळ आयुष्यातील सर्वोत्तम काळ ठरला. आयुष्याचे ध्येय सापडल्यानंतर जसा आनंद होतो, अगदी तसाच अनुभव या काळात आला.
प्रश्न : ‘रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनर’ हा सन्मान नेमका काय आहे?
उत्तर : राज्यातील ६६८ जण प्रशिक्षणासाठी होते. त्यात १८८ मुली व ४८० मुले होती. सेंटरमध्ये झालेल्या परीक्षांमध्ये ११ बक्षिसे मी जिंकली व बेस्ट कॅडेट म्हणून निवड झाली. ही निवड झाली की मानाची तलवार सलामी म्हणून दिली जाई; पण या वर्षापासून रिव्हॉल्व्हर देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्याची पहिली मानकरी होण्याचा मान मला मिळाला.
पॅशन असेल तरच या
खाकी वर्दीचे ग्लॅमर म्हणून फक्त झगमगाटाला भुलून या क्षेत्रात यायचे तर अजिबात येऊ नका. तुमच्यात पॅशन पाहिजे. सर्व प्रकारच्या लोकांचा सामना करण्याची तुमच्यात रग पाहिजे. चौकटीच्या पलीकडचे, तडजोडीचे आयुष्य जगण्याची इच्छा असेल तरच या, अन्यथा दुसरे क्षेत्र निवडा.