वातावरण बघून शिंदे गटात आलेल्यांना पदे देऊ नका, क्षीरसागर गटाची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 11:43 AM2023-06-30T11:43:36+5:302023-06-30T11:44:01+5:30
माजी आमदार चंद्रदीप नरके यांना पडद्याआडून विरोध
कोल्हापूर : वातावरण बघून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांना शासकीय समित्या, महामंडळावर घेऊ नये, अशी भूमिका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी घेतली आहे. जिल्हाप्रमुख चव्हाण हे नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे समर्थक मानले जातात. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीसाठी माजी आमदार चंद्रदीप नरके यांचे नाव चर्चेत आले आहे. त्यामुळे क्षीरसागर गटाने त्यांच्या नावाला अप्रत्यक्षरित्या विरोध केल्याचेच मानले जात आहे.
जिल्हाप्रमुख चव्हाण यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन होऊन वर्षाचा कालावधी उलटला आहे. सध्या प्रत्येक जिल्ह्यात विविध सरकारी समित्या व महामंडळांवर नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उठावानंतर त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेल्या कट्टर आणि निष्ठावंत शिवसैनिकांचीच शासकीय समित्या आणि महामंडळांवर नियुक्ती करण्यात यावी, असा निर्णय प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या उठावानंतर त्यांच्या पाठीशी ठाम राहिलेल्या निष्ठावंत शिवसैनिकांचीच नियुक्ती व्हावी. सध्याच्या घडीला काहीजण वातावरण बघून प्रवेश करत आहेत. शिवसेनाप्रमुख आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार पुढे घेऊन जाणाऱ्या शिवसैनिकाला न्याय द्यावा, अशी मागणी लेखी पत्राद्वारे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नरके यांची आता जवळीक...
माजी आमदार नरके यांनी गेल्यावर्षी झालेल्या सत्तांतरामध्ये सुरुवातीला उघड भूमिका घेतली नव्हती. वेळ आल्यावर योग्य भूमिका घेऊ, असे ते सांगत आले. ‘शासन आपल्या दारी’च्या निमित्ताने त्यांनी उघडपणे मुख्यमंत्री शिंदे गटाचे नेतृत्व स्वीकारले. नरके यांचे व्याही हे मुख्यमंत्र्यांचे उजवे हात मानले जातात. त्यातून त्यांची मुख्यमंत्र्यांशी जवळीक वाढली आहे. जिल्ह्याच्या राजकारणात त्यांच्याकडे सध्या कोणतेच पद नसल्याने देवस्थान समितीसाठी त्यांचे नाव पुढे आल्याचे समजते.