लॉकडाऊनमुळे टिंबर मार्केट ‘डाऊन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 02:04 PM2020-04-24T14:04:34+5:302020-04-24T14:15:41+5:30
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसाय संकटात आले आहेत. यामध्ये टिंबर मार्केटचाही समावेश आहे. गेल्या ४८ वर्षांत प्रथमच टिंबर मार्केट महिनाभर बंद आहे.
विनोद सावंत
कोल्हापूर : लॉकडाऊनमुळे टिंबर मार्केटलाही फटका बसला आहे. गेल्या महिन्यापासून येथील कामकाज ठप्प असून कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. यावर अवलंबून असणाऱ्या साडेतीन हजार लोकांसमोर आर्थिक संकट आहे. टिंबर मार्केटच्या स्थापनेपासून प्रथमच अशी स्थिती निर्माण झाली आहे.
तत्कालीन आयुक्त द्वारकानाथ कपूर यांनी १९७२ च्या सुमारास स्वतंत्र जागा आरक्षित करून टिंबर मार्केट सुरू केले. माजी महापौर प्रल्हाद चव्हाण, चंद्रकांत साळोखे आणि एन. डी. जाधव यांंच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले. यामुळे हजारो लोकांना रोजगार मिळाला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसाय संकटात आले आहेत. यामध्ये टिंबर मार्केटचाही समावेश आहे. गेल्या ४८ वर्षांत प्रथमच टिंबर मार्केट महिनाभर बंद आहे.
सुतारकाम करणारे हवालदिल
टिंबर मार्केट बंद असल्यामुळे येथील वखारींमध्ये तसेच घरगुती काम करणारे, सुतारकाम करणाºया शेकडो कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. बँकेतील शिल्लक रकमेवर तसेच मित्रमंडळींच्या सहकार्यावर त्यांचा उदरनिर्वाह सुरू असून दानशूर व्यक्तींनी त्यांना मदत करण्याची गरज आहे.
‘बांधकाम ठप्प’चाही परिणाम
बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच छताखाली म्हणजे टिंबर मार्केट येथे उपलब्ध होते. लॉकडाऊनमुळे बांधकाम थांबल्यामुळे टिंबर मार्केट येथील व्यवसायही ठप्प आहे.
टिंबर मार्केटमध्ये एकूण कारखाने - १७०
मोठे कारखाने - ५०
टिंबर मार्केटवर आवलंबून नागरिक - ३५००
हमाल - ५०
टेम्पोचालक - १००
-------------------------------------------------------------
टिंबर मार्केटमध्ये विक्री
- सेंट्रिंग साहित्य
- लाकडी खिडकी, चौकट
- स्लाइडिंग खिडकी
- फरशी, सिमेंट सळी
- प्लायवूड
- फायबरच्या वस्तू
- बांबू, पायाड
- बॅटन, तट्टे, निलगिरी सर
लॉकडाऊनमुळे बांबू विक्री ठप्प असून यावर अवलंबून असणाºया सुतार, सेंट्रिंग कामगारांनाही फटका बसला आहे. विक्रीच बंद असल्यामुळे उत्पन्न थांबले असून घरखर्च कसा करायचा, हा प्रश्न आहे.
- महेश सूर्यवंशी, बांबू व्यापारी, टिंबर मार्केट
टिंबर मार्केट महिनाभर बंद राहण्याचीही पहिलीच वेळ आहे. मार्केटवर अवलंबून असणारे व्यापारी, कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्हा टिंबर असोसिएशन, कोल्हापूर टिंबर कॉर्पोरेशन (बांबू व्यवसाय) यांच्यामार्फत कामगारांना धान्य वाटप केले. सामाजिक बांधीलकी म्हणून पोलीस, डॉक्टरांनीही मदत केली.
- लक्ष्मण पटेल, सहसचिव, कोल्हापूर जिल्हा टिंबर असोसिएशन