संचालक पदाची ‘मिजास’ डोक्यात जाऊ देऊ नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:24 AM2021-05-08T04:24:19+5:302021-05-08T04:24:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सभासदांनी ज्या विश्वासाने ‘गोकुळ’ची सत्ता आमच्या हातात दिली, त्याला पात्र राहून काम करायचे आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सभासदांनी ज्या विश्वासाने ‘गोकुळ’ची सत्ता आमच्या हातात दिली, त्याला पात्र राहून काम करायचे आहे. ‘गोकुळ’चे संचालक म्हणून जी काही मिजास डोक्यात आहे, ती काढून टाकून दूध उत्पादकाच्या हिताचा कारभार करा, असा सल्ला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी नवनिर्वाचित संचालकांना दिला. ‘गोकुळ’च्यावतीने त्वरित ऑक्सिजन प्रकल्प उभा करावा, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली.
‘गोकुळ’च्या नवनिर्वाचित संचालकांसह नेत्यांची बैठक शुक्रवारी डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये झाली. त्यावेळी ते बोलत होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, मागील संचालक मंडळाने रोज वीस लाख लीटर दूध संकलन गृहित धरून शंभर कोटी खर्चून विस्तारवाढ केली. मात्र, सध्या १३ ते १४ लाख लीटर दूध संकलन होत आहे. ते २० लाख लीटरपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. काटकसरीचा कारभार करत दूध उत्पादकाच्या पदरात चार रूपये जादा देण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. सध्या ‘गोकुळ’ देशात २७ व्या क्रमांकावर आहे, तो ‘अमूल’च्या बरोबरीने आणण्यासाठी आमचा प्रयत्न राहील.
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, संकलन, प्रक्रिया व मार्केटिंग या तीन टप्प्यांपैकी प्रक्रिया व मार्केटिंगमध्ये काटकसरीचे धोरण राहणार आहे. जाहीरनाम्यात दिलेल्या प्रत्येक वचनाची पूर्तता करण्याची जबाबदारी आमची आहे. ऑक्सिजन प्रकल्प उभा करत असताना कोविडचे संकट गेल्यानंतर तो उद्योगांना विकता येईल, त्यातून उत्पन्नात भर पडणार आहे. येनकेन प्रकारे दूध उत्पादकाला दोन रूपये जादा देण्याचा प्रयत्न राहील.
उत्पादकांच्या प्रश्नांसाठी संचालक ताराबाई पार्क कार्यालयात
दूध उत्पादकांसह संस्था प्रतिनिधी समस्या घेऊन ताराबाई पार्क कार्यालयात येतात, मात्र अध्यक्षांसह संचालकांची बसण्याची व्यवस्था गोकुळ शिरगाव येथील प्रकल्पावर आहे. त्यामुळे चंदगड, आजरा तालुक्यातून दोनशे किलोमीटरवरून आलेल्या शेतकऱ्याला संचालकांची भेट घेणे अवघड होते. यासाठी ताराबाई पार्क कार्यालयात अध्यक्षांसह दोन संचालक रोज तिथे थांबून प्रश्नांचा निपटारा करतील, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.
बाळूमामांची काठी ले वाईट लागती
निवडणुकीत, सावकर (विनय कोरे) बाळूमामाचा भंडारा उचलून आमच्यासह मतदारांच्या शपथा घेतल्या. आता बैठकीला येताना बाळूमामाच्या समाधीवरील भंडारा घेऊन आलोय, नवनिर्वाचित संचालकांनी तो उचलायचा आहे. गोरगरीब दूध उत्पादकांसाठी एकत्र राहणार, चांगला कारभार करणार म्हणून शपथ घ्यावी. बंटीसाहेब बाळूमामाची काठी फार वाईट लागते, हे निवडणुकीत काहींना कळल्याचा टोला के. पी. पाटील यांनी लगावला.
बाजार समितीसारखे करू नका
घोड्यावर बसवले की, तुम्ही तिकडे लक्ष देत नाही, त्यामुळे घोडी उधळतात. सावकर, बाजार समितीत तेच झाले. आम्ही यायच्या अगोदर चहा प्यायलाही पैसे नव्हते. आता पाच कोटींच्या ठेवी आहेत. ‘गोकुळ’मध्ये अंकुश ठेवा, अशी सूचना के. पी. पाटील यांनी केली.