पर्यटन म्हणून शेतकऱ्यांची थट्टा करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:24 AM2020-12-29T04:24:02+5:302020-12-29T04:24:02+5:30
उत्तूर : शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत आंदोलन केले तर पर्यटन वाटते. पर्यटन म्हणून शेतकऱ्यांची थट्टा करू नका, असा टोला ग्रामविकास मंत्री ...
उत्तूर : शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत आंदोलन केले तर पर्यटन वाटते. पर्यटन म्हणून शेतकऱ्यांची थट्टा करू नका, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना करंबळी (ता. गडहिंग्लज) येथील शिवार संवाद कार्यक्रमात बोलताना भाजप ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी हाणला. अध्यक्षस्थानी किसान मोर्चाचे अध्यक्ष भगवान काटे होते.
मुश्रीफ यांचे नाव न घेता घाटगे म्हणाले, स्वयंघोषित जिल्ह्यातील नेत्यांना पर्यटन वाटते. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवार संवादातून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. शेतकरी कर्जमाफी, पीक विमा, वीज बिल याबाबत प्रश्न उपस्थित केले की पर्यटन वाटते. कधीतरी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधला आहे का ? ज्या शेतकऱ्यांच्या जिवावर निवडून आलात, तेच शेतकरी तुम्हास घरी बसविल्याशिवाय राहणार नाहीत. पहिल्यांदा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा व त्यांना न्याय द्या.
आंबेओहोळ प्रकल्पाचे मंजूर झालेले २२७ कोटी गेले कोठे ? या प्रश्नाचे उत्तर नाही. अधिकारी म्हणतात, शासनाकडून पैसे आले नाहीत. नेमकं काय समजू तरी द्या. आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही.
यावेळी भगवान काटे, संजय बटकडली, शैलेश कावणेकर यांनी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमास गणपतराव डोंगरे, शैलेश मुळीक, विठ्ठल पाटील, जि. प. सदस्या अनिता चौगुले, प्रवीण माळी, प्रकाश पाटील, निलांबरी भुईबर, दीपक पाटील, मन्सूर माने, संजीवनी माने, अजित जामदार, आशिष देसाई आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
------------------------
पैसे आडवा अन् जिरवा
आंबेओहोळ प्रकल्प गेली कित्येक वर्षे रखडला आहे. पैसे आडवा अन् पैसे जिरवा असा प्रकार धरणात चालू आहे. हे राजकारणी सत्तेत आहेत तोपर्यंत प्रकल्प पूर्ण होणार नाही, तर पैसे जिरवण्याचे काम सुरू राहील.
- भगवान काटे.
-------------------------
फोटो ओळी : करंबळी (ता. गडहिंग्लज) येथील शिवार संवाद कार्यक्रमात भाजप अध्यक्ष समरजित घाटगे यांनी मार्गदर्शन केले. दुसऱ्या छायाचित्रात करंबळी (ता. गडहिंग्लज) येथे ऊस पिकाची लागवड करताना समरजित घाटगे.
क्रमांक : २७१२२०२०-गड-०२/०४