हॉटेल उघडले म्हणून जिभेचे लाड नको; आला पावसाळा, पोट सांभाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 12:40 PM2021-07-17T12:40:01+5:302021-07-17T12:43:00+5:30
CoronaVirus Hoteling Kolhapur : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर काहीअंशी हॉटेल, रेस्टॉरंट उघडू लागली आहेत. त्यामुळे खवय्यांची गर्दी येथे सुरू होणार आहे. त्यात पावसाळाही सुरू झाला आहे. त्यामुळे खवय्यांनी पोट आणि कोरोना संसर्गापासून सावध राहणे गरजेचे आहे. हॉटेल उघडली तरी जिभेचे लाड नको, पोट सांभाळणे गरजेची बाब बनली आहे.
कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर काहीअंशी हॉटेल, रेस्टॉरंट उघडू लागली आहेत. त्यामुळे खवय्यांची गर्दी येथे सुरू होणार आहे. त्यात पावसाळाही सुरू झाला आहे. त्यामुळे खवय्यांनी पोट आणि कोरोना संसर्गापासून सावध राहणे गरजेचे आहे. हॉटेल उघडली तरी जिभेचे लाड नको, पोट सांभाळणे गरजेची बाब बनली आहे.
कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून हॉटेल रेस्टॉरंटमध्ये बसून जेवण, नाश्ता बंद आहे. केवळ पार्सल सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. जस-जसा संसर्ग कमी होईल तसा निर्बंध कमी केले जात आहेत. येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट उघडणार आहेत. मात्र, लोकांनी कोरोना संसर्गाची जाणीव ठेवून सर्वत्र संचार करणे गरजेचे आहे.
पावसाळ्यात हे खायला हवे
- भाजलेला मका खा. त्यामुळे व्हिटॅमिन्स मिळतात.
- आल्याचा अथवा तुळस घातलेला चहा प्यावा. त्यात चवीकरिता मध, लिंबूही टाकता येतो.
- ताज्या भाज्या खाव्यात. विशेषत: मोड आलेले कडधान्ये खावीत.
- ब्रोकोली, गाजर, मशरूम, टॉमेटो उकडून खाले तर ते शरीरास खूप फायदेशीर टरते.
- थंडगार ज्यूस, शीतपेयेऐवजी विविध फळांच्या स्मुदी प्याव्यात.
- इम्युनिटी वाढविण्यासाठी प्रमाणात ड्रायफ्रूट्स, फळे खावेत.
- मोरावळा खावा. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, ओटस यांपासून बनविलेले पदार्थ.
- दुधात सूंठ, हळद घालून प्यावी.
पावसाळ्यात हे खाणे टाळावे.
- जड पदार्थ, मीठ जास्त असलेले पदार्थ
- रस्त्यावरील आंबवलेले पदार्थांपैकी इडली, डोसा
- शिळे अन्न पदार्थ खाऊ नका.
- रस्त्यावरील अन्न नकोच
अनेकदा रस्त्यावरील अन्नपदार्थ ज्या ठिकाणी केले जातात, ती जागा अनेकदा अस्वच्छ असते. त्यामुळे पदार्थांमधून रोगराई पसरण्याची शक्यता अधिक असते. कोणत्या प्रकारचे तेल वापरले जाते याची माहिती नसते. याशिवाय अनेकदा दिवसभरात एकाच तेलात अनेकदा पदार्थ तळलेले असतात. त्यामुळे खाणाऱ्या शरीरात कोलस्ट्रॉल वाढणे, मळमळणे, पित्त होणे, पोट बिघडणे, शौचास लागणे, आदी समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे रस्त्यावरील अन्नपदार्थ न खाल्लेलच बरे. अनेक मंडळी गाडीवरील ज्यूसही पितात. त्यात कोणत्या प्रकारचे रंग, पाणी अथवा तत्सम पदार्थ वापरले जातात. याची माहिती नसते. त्यामुळेही आरोग्य धोक्यात येऊ शकते.
आहारतज्ज्ञ काय म्हणतात?
पावसाळा आणि कोरोना काळात बाहेरील अन्नपदार्थांऐवजी घरातील खाद्यपदार्थ खावेत. वरण-भात, चपाती, भाकरी, भाजी, कोशिंबीर खावी. फळे खावीत. चांगली झोप घेणे आवश्यक बाब आहे. मधुमेही रुग्णांनी या काळात अधिकची काळजी घेणे गरजेचे आहे.
-डॉ. आशा जाधव,
अध्यक्षा, कोल्हापूर मेडिकल असोसिएशन
पावसाळ्यात भाज्या मिठाच्या पाण्यात धुवूनच वापराव्यात. उकडलेल्या भाज्यांचे सूप घ्यावेत. चायनीज व तळलेले पदार्थ खाऊ नयेत. घरचे अन्न केव्हाही चांगलेच असते. त्यामुळे बाहेरचे पदार्थ न खाललेच बरे.
- डॉ. शरद पोवार,
आयुर्वेदाचार्य