भोगावतीच्या कर्जाचे राजकारण करू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:21 AM2021-03-07T04:21:34+5:302021-03-07T04:21:34+5:30
भोगावती : भोगावती साखर कारखान्याचा कर्जाचा आकडा वेगवेगळा सांगून कारखान्याची बदनामी केली जात आहे. मात्र, कारखान्यावर ३०५ कोटींचे कर्ज ...
भोगावती :
भोगावती साखर कारखान्याचा कर्जाचा आकडा वेगवेगळा सांगून कारखान्याची बदनामी केली जात आहे. मात्र, कारखान्यावर ३०५ कोटींचे कर्ज आहे. सध्या शिल्लक असणारी साखर विक्री केल्यावर ६७ कोटी कर्ज शिल्लक राहील हे समजून घ्यावे, असे अध्यक्ष व आमदार पी. एन. पाटील यांनी स्पष्ट केले. परिते (ता. करवीर) येथील भोगावती साखर कारखान्याची ६४ वी वार्षिक साधारण सभा झाली. त्यावेळी अध्यक्षपदावरून पी. एन. पाटील बोलत होते.
अध्यक्ष पाटील पुढे म्हणाले, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाने साखर कारखानदारी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. ऊस उत्पादक सभासदांना बिल देण्यासाठी देखील कर्जासाठी बँकेच्या दारात उभे राहावे लागत आहे. सरकारने ठरवून दिलेल्या साखरेच्या दरापेक्षा ८०० ते ९०० रुपये जादा ऊसदर द्यावा लागत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस या तफावतीमुळे कर्जाचा आकडा वाढू लागला आहे. सध्या राज्यातील एकही कारखाना एकरकमी बिल देत नाही.
उपाध्यक्ष उदयसिंह पाटील-कौलवकर म्हणाले, ऑनलाइन सभेला सभासदांचा मिळालेला भरघोस पाठिंबा हे अशिक्षित की सुशिक्षितपणाचे लक्षण आहे, हे समजून घ्यावे. कारखान्यावर असणाऱ्या कर्जाची चुकीची आकडेवारी सादर करून विरोधक कोणता हेतू साध्य करत आहेत माहीत नाही. मात्र, साखर पाहता कारखाना प्लस मध्ये दिसून येणार आहे. आ. पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखालील हा कारखाना निश्चितच कर्जमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. दराच्या आणि कर्जाच्या बाबतीत शेजारील कारखान्यांची देखील तीच परिस्थिती आहे. यापूर्वीच्या संचालक मंडळाने कारखान्याचा मद्यार्क प्रकल्प भाडे तत्त्वावर देऊन मोठी चूक केली आहे, असेही ते म्हणाले.
माजी उपाध्यक्ष केरबा पाटील यांनी यापूर्वीचा दोनशे रुपयांचा हप्ता, ५८० कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील निर्णय आणि बँक ऑफ इंडियाचे थकीत कर्ज यावर निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रा. जे. जे. पाटील म्हणाले, या घडीला कारखाना ५२५ कोटींच्या कर्जाच्या खाईत आहे. यापूर्वी असणाऱ्या १०५ कोटींवरून एवढे कर्ज वाढले आहे. ६४ वर्षांच्या कार्यकाळात कारखान्याला साखर मळी यापेक्षा दुसरी कुठल्याही पद्धतीचे उत्पादने घेता आलेले नाही, ही शोकांतिका आहे.
यावेळी माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले, धैर्यशील पाटील-कौलवकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, अजित पाटील, बंडोपंत वाडकर, बाबासाहेब देवकर, डॉ. सुभाष जाधव, विलास चौगुले, मनोज पाटील यांनी चर्चेत भाग घेतला.
स्वाभिमानीची समांतर सभा :
भोगावतीची आजची सभा कोरोनाची भीती घालून पार पाडली आहे. मुख्य उद्देश म्हणजे अहवाल सालातील केलेल्या भानगडी लपवण्यासाठी केलेला उद्योग आहे. ही सभा आम्हाला मान्य नाही. त्यामुळे आम्ही निषेध करतो, असे प्रदेशाध्यक्ष प्रा. जे. जे. पाटील आणि जिल्हा अध्यक्ष जनार्दन पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी संघटनेचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
०६ भोगावती कारखाना सभा
भोगावतीची जनरल सभा फोटो ओळी : भोगावती कारखान्याच्या वार्षिक साधारण सभेत बोलताना आ. पी. एन. पाटील. यावेळी उपाध्यक्ष उदयसिंह पाटील-कौलवकर कृष्णराव किरुळकर, विश्वनाथ पाटील, के. एस. चौगले व सर्व संचालक.