पन्हाळगडावर यंदा साध्या पद्धतीने शिवजयंती, शिवज्योती नेण्यासाठी गर्दी करु नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 06:18 PM2021-02-12T18:18:59+5:302021-02-12T18:22:57+5:30
Corona Panhala Shivjayanti Kolhapur- कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन ऐतिहासिक पन्हाळगडावर शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी केली जाणार आहे. त्यामुळे शिवभक्तांना पन्हाळगडावरुन शिवज्योत नेण्यास परवानगी नसेल, अशी माहिती नगराध्यक्षा रुपाली धडेल यांनी दिली.
पन्हाळा - १९ फेब्रुवारी रोजी अवघ्या महाराष्ट्रात शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरी केली जाते.मात्र कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन ऐतिहासिक पन्हाळगडावर शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी केली जाणार आहे. त्यामुळे शिवभक्तांना पन्हाळगडावरुन शिवज्योत नेण्यास परवानगी नसेल, अशी माहिती नगराध्यक्षा रुपाली धडेल यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून, प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले.
१९ फेब्रुवारी रोजी अवघ्या महाराष्ट्रात शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरी केली जाते. शिवजयंतीला अनेक गडकिल्ल्यांवरुन शिवज्योत नेली जाते. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे दीर्घ काळ वास्तव्य असणाऱ्या ऐतिहासिक पन्हाळगडावरून देखील शिवज्योत घेऊन जातात. त्यासाठी कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर ,सांगली, सातारा, पुणे यासह इतर जिल्ह्यातून शिवभक्त ऐतिहासिक पन्हाळगडावर दाखल होत असतात. यासोबतच, कर्नाटक राज्यातून बेळगाव, हुबळी, धारवाड, अथणी परिसरातून सुद्धा मोठ्या प्रमाणात शिवभक्त शिवज्योत नेण्यासाठी पन्हाळगडावर येतात.
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पन्हाळगडावर शिवज्योत घेऊन जाण्यासाठी शिवभक्तांनी येऊ नये, कोरोनाचा संसर्ग कमी असला, तरी त्याचे गांभीर्य ओळखून हा निर्णय घेतला आहे. शिवभक्तांनी पन्हाळगडावर न येत, आपल्याच गावी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करा, तसेच कोरोनापासून वाचण्यासाठी गर्दी न करता प्रशासनाला सहकार्य करावे.
- रुपाली धडेल,
नगराध्यक्ष,पन्हाळा.