मराठ्यांच्या विरोधात बोलू नका, संयमाने वागा, अन्यथा..; शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचा मंत्री भुजबळांना इशारा
By राजाराम लोंढे | Published: January 27, 2024 01:03 PM2024-01-27T13:03:16+5:302024-01-27T13:07:04+5:30
कोल्हापूर : छगन भुजबळ हे ज्येष्ठ मंत्री असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयावर अशा पध्दतीने बोलणे उचित नाही. मराठ्यांच्या विरोधात बोलू नका, ...
कोल्हापूर : छगन भुजबळ हे ज्येष्ठ मंत्री असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयावर अशा पध्दतीने बोलणे उचित नाही. मराठ्यांच्या विरोधात बोलू नका, संयमाने वागा अन्यथा रस्त्यावर फिरु देणार नाही, असा इशारा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिला.
राज्य शासनाने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्याबद्दल छत्रपती शिवाजी चौकात शिवसेनेच्या वतीने साखर-पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला, त्यावेळी ते बोलत होते.
राजेश क्षीरसागर म्हणाले, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन मराठा बांधवांना दिलेला शब्द पाळला. आरक्षणाचा विषय सोडवला तर ते केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच सोडवू शकतात, हा विश्वास मनोज जरांगे-पाटील यांना होता. बऱ्याच वर्षानंतर मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली असताना छगन भुजबळ यांनी त्याला गालबोट लागेल असे वक्तव्य करु नये.
इतरांच्या आरक्षणाला धक्का लागेल असा निर्णय झालेला नाही, याची जाणीव ओबीसी समाजाला आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांनी उगीच समाजाला उचकावू नये, चुकीचे कराल तर मुख्यमंत्री शिंदे हे योग्य निर्णय घेतील, असा इशारा क्षीरसागर यांनी दिला.