यापुढे घरात बसणं नको, संसर्गही नकोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:16 AM2021-07-19T04:16:17+5:302021-07-19T04:16:17+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत असून, शहरातील सर्व व्यवसाय आज, सोमवारपासून पूर्ववत सुरू होत आहेत. ...

Don't stay at home anymore, don't get infected | यापुढे घरात बसणं नको, संसर्गही नकोच

यापुढे घरात बसणं नको, संसर्गही नकोच

Next

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत असून, शहरातील सर्व व्यवसाय आज, सोमवारपासून पूर्ववत सुरू होत आहेत. ही एक आनंदाची बातमी असली तरी तिसऱ्या लाटेची घंटादेखील वाजलेली आहे. आरोग्य यंत्रणेने खबरदारीचा इशारा दिला आहे. त्यामुळे यापुढे उद्योग, नोकरी, व्यवसाय बंद करून घरात बसायचे नसेल तर आरोग्य यंत्रणेने दिलेल्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे.

गेल्या सोळा महिन्यांपासून कोरोनाच्या संकटाने प्रत्येक घटकाला, प्रत्येक व्यक्तीला अद्दल घडविली आहे. दैनंदिन सर्वच व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाहीत. एका लाटेतून सावरतो न सावरतो तोच दुसरी लाट आली आणि बघता बघता पुन्हा लॉकडाऊन झाला. अनेकांना व्यवसाय बंद ठेऊन घरात बसण्याची नामुष्की आली. प्रत्येक व्यक्ती या कोरोनाच्या संसर्गाने त्रस्त झाली आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बुडाला. आर्थिक टंचाई जाणवायला लागली आहे. पहिल्या लाटेवेळी सगळेच अनभिज्ञ होते. त्यामुळे संकटाचा सामना करता करता सर्वांचीच धावपळ उडाली. संकट सावरता सावरता नाकी दम आला. आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडला. रुग्णसंख्येच्या तुलनेत योग्य उपचार मिळाले नाहीत. बऱ्याच जणांना उपचार घेण्याकरिता बेड, ऑक्सिजनअभावी प्राणास मुकावे लागले. इतकी सारी दैना पहिल्या व दुसऱ्या लाटेत झाली.

आता दुसरी लाट ओसरत आहे, परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. आज, सोमवारपासून सर्व व्यवहार, व्यवसाय सकाळी सात ते दुपारी चार या वेळेत सुरू होत आहेत. ही दिलासा देणारी समाधानाची बाब असली तरी तिसऱ्या साथीची टांगती तलवार आपण सर्वांवर आहे. त्यामुळे जबाबदारी अधिकच वाढली आहे. आरोग्य यंत्रणेची क्षमता लक्षात घेता ही तिसऱ्या लाटेत संसर्ग वाढणार नाही, याची खबरदारी आपण सर्वांनाच घ्यावी लागणार आहे. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य बनते. जर घरात बसायचे नसेल, सर्व व्यवसाय पूर्ववत सुरू ठेवायचे असतील तर कोरोनाला हरवण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेऊन प्रशासनास सहकार्य केले पाहिजे.

- या गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात -

- सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्याचे टाळावे

- रस्त्यावर येताच नाकाला मास्क लावा.

- दोन व्यक्तींत पुरेसे अंतर ठेऊन संवाद करावा.

- हॅन्ड सॅनिटायझरचा सतत वापर करावा.

- सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी असल्यास त्वरित उपचार घ्यावेत.

- कोणताही आजार अंगावर काढू नका, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

- व्यावसायिकांची खबरदारी घ्यावी -

आता जबाबदारी व्यापारी, दुकानदारांची आहे. आपल्या दुकानात गर्दी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. मास्क असल्याशिवाय कोणाला दुकानात प्रवेश देऊ नका. आंदोलन करून दुकाने सुरू करण्यास परवानगी मागणी हा आपला हक्क असला तरी कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, याची खबरदारी घेणे आपले कर्तव्य आहे. तिसऱ्या लाटेत संसर्ग वाढणार नाही, पुन्हा लॉकडाऊन होणार नाही, याची काळजी घ्यावी.

संजय शेटे, अध्यक्ष

कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स

Web Title: Don't stay at home anymore, don't get infected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.