संभाजीराजेंनी सरकारला जयप्रभा स्टुडिओप्रश्नी लक्ष घालण्याची केली विनंती, म्हणाले...

By संदीप आडनाईक | Published: October 21, 2022 04:59 PM2022-10-21T16:59:31+5:302022-10-21T17:21:04+5:30

जयप्रभा स्टुडिओ संपविण्याचा घाट घालणाऱ्या कुणालाही सरकारने पाठीशी न घालता स्थानिक कलाकारांची साद ऐकावी व जयप्रभा स्टुडिओला गतवैभव मिळवून द्यावे

Don't support those who are threatening to end Jayaprabha Studio says Sambhaji Raje Chhatrapati | संभाजीराजेंनी सरकारला जयप्रभा स्टुडिओप्रश्नी लक्ष घालण्याची केली विनंती, म्हणाले...

संभाजीराजेंनी सरकारला जयप्रभा स्टुडिओप्रश्नी लक्ष घालण्याची केली विनंती, म्हणाले...

Next

कोल्हापूर : कोल्हापूरचा जयप्रभा स्टुडिओ वाचविण्यासाठी गेले अडीचशे दिवस आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी उग्र रूप धारण करुन आज, शुक्रवारी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विट करीत सरकारला या विषयात लक्ष घालण्याची विनंती करत जयप्रभा स्टुडिओ संपविण्याचा घाट घालणाऱ्यांना पाठीशी घालू नये, अशी मागणी करत जयप्रभा स्टुडिओला गतवैभव मिळवून द्यावे, असे आवाहन केले आहे.

छत्रपती संभाजीराजे यांनी आज, त्यांच्या ट्विटर खात्यावरुन हे आवाहन केले. या ट्विटमध्ये ते म्हणाले, भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ कोल्हापुरात रोवली गेली. शाहूपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी चित्रपट सृष्टीस उत्तेजन देण्यासाठी कोल्हापूर येथे स्टुडिओ सुरू केला. सध्या जयप्रभा स्टुडिओ या नावाने ओळखला जाणारा हा स्टुडिओ नंतरच्या काळात महाराजांनी हा स्टुडिओ केवळ चित्रपट निर्मितीसाठीच वापरायचा या अटीवर सुप्रसिध्द चित्रपट निर्माते भालजी पेंढारकर यांच्याकडे सोपविला.

बहुतांश नामांकित मराठी चित्रपटांचे शूटिंग हे याच स्टुडिओमध्ये झालेले आहे. कित्येक हिंदी चित्रपट देखील याठिकाणी घडले. नंतर काही कारणांनी पेंढारकर यांनी देखील या स्टुडिओवरील ताबा गमविला. कोल्हापूरच्या कलानगरीचा कणा असणारा हा ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओ अलिकडच्या काळात विकसकाच्या घशात घातला जात आहे. यामुळे या स्टुडिओचे अस्तित्व संपत चालले आहे.

कोल्हापूरात गेले २५० दिवस कलाक्षेत्राशी निगडीत जनतेचे हे आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलनाने उग्र रूप धारण केले आहे. राज्य सरकारने यामध्ये तातडीने लक्ष घालावे. जयप्रभा स्टुडिओ संपविण्याचा घाट घालणाऱ्या कुणालाही सरकारने पाठीशी न घालता स्थानिक कलाकारांची साद ऐकावी व जयप्रभा स्टुडिओला गतवैभव मिळवून द्यावे, असे आवाहन संभाजीराजे यांनी केले आहे.

Web Title: Don't support those who are threatening to end Jayaprabha Studio says Sambhaji Raje Chhatrapati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.