प्रवक्त्याच्या आडून बोलू नका, संजय मंडलिकांचे शाहू छत्रपतींना जाहीर चर्चेचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 12:53 PM2024-04-25T12:53:57+5:302024-04-25T12:54:29+5:30
प्रवक्त्यांचा हुकूमशाही थाट
कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांचा केवळ वारसा सांगण्यापेक्षा आपण कोल्हापूरच्या विकासासाठी आतापर्यंत काय पावले उचलली याची जाहीर चर्चा करण्याचे आवाहन महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी शाहू छत्रपती यांना केले आहे. सातत्याने प्रवक्त्याच्या आडून वारसा न सांगता समोर या, असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या तयारीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांचा समतेचा विचार दिल्लीत पोहोचवायला आम्ही कटिबद्ध आणि समर्थ आहोत. राजर्षी शाहू महाराज ही आमचीदेखील अस्मिता आहे. ती आम्ही जपूच. पण अस्मिता जपताना आपल्या कर्तव्यात कुठे कसूर होणार नाही याचं भानही प्रतिस्पर्धी उमेदवारानं राखलं पाहिजे. पण सध्या नुसताच वारसा हक्कावर दावा केला जातो आहे. आपल्या ५० वर्षांतील कामाचा लेखाजोखा काही मांडला जात नाही. गादीच्या अपमानाचा कांगावा केला जात आहे. पण, प्रत्यक्ष जे उमेदवार आहेत त्यांनी गादीचा लौकिक वाढावा, राजर्षी शाहूंचा कृतिशील वारसा जपावा यासाठी काय केलं? हेदेखील सांगितलं पाहिजे.
मंडलिक म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी केलेला विकास आणि सुधारणा विसरता येत नाही. मात्र त्यांच्या कामाचे श्रेय न घेता आपण कोल्हापूरच्या विकासासाठी काय केले हे आत्ताच्या उमेदवारांनी सांगावे. निवडणुकीच्या निमित्ताने ते विचारण्याची वेळ आली आहे. तेव्हा उमेदवार असलेल्या शाहू छत्रपतींनी समोरासमोर यावे.
प्रवक्त्यांचा हुकूमशाही थाट
मंडलिक म्हणाले, एकंदरीतच प्रवक्त्यांचा या निवडणुकीतील उत्साह पाहता शाहू छत्रपती यांच्यावर उमेदवारी लादली गेली असल्याचे स्पष्ट होते. तब्बल २५ वर्षे याच मातीत असलेला पैलवान अशी स्वतःची ओळख करून देणाऱ्यांना हे लक्षात येत नाही, की निवडणुकीला उभ्या असणाऱ्या उमेदवाराने प्रचारावेळी आपल्या विकासाच्या अजेंडाबाबत बोलणे महत्त्वाचे असते. आपण सांगू त्याच पद्धतीने प्रत्येकाने वागावे, अशा हुकूमशाही थाटात प्रवक्ते वावरत आहेत.