घरात पाणी येईपर्यंत वाट पाहू नका, स्थलांतरित व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:15 AM2021-07-23T04:15:15+5:302021-07-23T04:15:15+5:30
कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे शहरातील काही सखाल भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. पाऊस अजूनही सुरूच आहे. नागरिकांना आपल्या घरात ...
कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे शहरातील काही सखाल भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. पाऊस अजूनही सुरूच आहे. नागरिकांना आपल्या घरात पाणी येण्याची वाट पाहू नका, त्वरित सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केली आहे.
शहरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे ओढ्यानजीक व सखल भागाच्या परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती मिळताच गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता प्रशासक बलकवडे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शहरात फिरतीसाठी बाहेर पडल्या. त्यांनी पाणी आलेल्या रामानंदनगर, शाहुपुरी कुंभार गल्ली, सुतारवाडा, जामदार क्लब, नागाळा पार्क व मुक्त सैनिक वसाहत येथे पाणी आलेल्या सखल भागाची पाहणी केली.
महापालिकेची सर्व यंत्रणा पूर परिस्थितीचा मुकाबला करण्याची सज्ज आहे. स्थलांतरितांसाठी राहण्यासाठी शाळा व मंगल कार्यालये महापालिकेने सज्ज ठेवली आहेत. रामानंदनगर येथील २३ कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे. तर शाहुपुरी कुंभार गल्ली येथील ८ कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे. कोराेनाच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरित ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून दक्षता घेतली जात असल्याचे बलकवडे यांनी सांगितले.
या वेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त निखिल मोरे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, एन. एस. पाटील, नारायण भोसले, बाबूराव दबडे उपस्थित होते.
कृषी विभागाचा बंधारा काढण्याची मागणी -
रामानंद नगराजवळील जाधव पार्क येथे कृषी विभागाने पूर्वी बांधलेला बंधाऱ्यामुळे नाल्यातील पाणी आसपासच्या घरात शिरत असल्याने तो बंधारा काढावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली. त्यानुसार आमदार ऋतुराज पाटील यांनी हा बंधारा काढण्याचे नियोजन करण्याबाबत प्रशासकांना सूचना दिल्या. पाणी निचरा होण्यासाठी पावसापूर्वीच या बंधाऱ्याच्या बाजूस मोठी चर मारून पाणी बायपास केले असल्याचे प्रशासक बलकवडे यांनी सांगितले. बंधारा काढण्याबाबत शहर अभियंत्यांशी चर्चा करू, असे सांगितले.