Radhanagari Dam : राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 11:57 AM2021-12-29T11:57:34+5:302021-12-29T15:59:44+5:30
तांत्रिक काम सुरु असताना दरवाजा अडकल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. यामुळे नदी पात्रातील पाण्याच्या पातणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
राधानगरी : राधानगरीधरणाचा दरवाजा बंद करण्यात आज दुपारी 3.15 च्या दरम्यान जलसंपदा विभागाला यश आले आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता (कोल्हापूर) रोहित बांदिवडेकर यांनी दिली.
आज सकाळी पावणे नऊच्या सुमारास या दरवाज्याचे काम सुरु असताना दरवाजा अडकल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु झाला होता. यामुळे नदी पात्रातील पाण्याच्या पातणीत वाढ होण्याची शक्यता होती. पंचगंगेसह अनेक नद्यांच्या पाणी पातळीत दिवसभरात ३ ते ४ फूटाने वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज कोल्हापूर पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता महेश सुर्वे यांनी व्यक्त केला होता. तरी नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला.
हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या यंत्रणेने जोरदार कामाला सुरुवात केली. अखेर दुपारी त्याला यश आले आणि हा दरवाजा बंद करण्यात आला. या दुरुस्तीसाठी पाटबंधारा विभागाची अनेक पथके रवाना झाली होती.
स्टार्टर स्वीच अचानक शॉर्ट होवून गेट आपोआप सुरू झालाची शक्यता तंत्रज्ञानांनी व्यक्त केली असून आज दिवसभरात कोणत्याही परिस्थितीत गेटची दुरुस्ती पूर्ण करण्याचा मानस ही त्यांनी व्यक्त केला.
पाण्याच्या दबावावर उघड-झाप होणारे स्वयंचलित दरवाजे हे धरणाचे वैशिष्ट्ये आहे. यामुळे हे धरण प्रसिध्द असून पावसाळ्यात हे दरवाजे उघडल्यानंतर पर्यटक ही दृश्य पाहण्यासाठी येत असतात. गेली अनेक वर्ष हे धरण मजबुत स्थितीत आहे.