प्राधिकरणाची ‘अंत्ययात्रा’ पालिकेच्या दारात!
By Admin | Published: May 20, 2015 10:37 PM2015-05-20T22:37:24+5:302015-05-21T00:02:37+5:30
‘फुटबॉल’ थांबवा : पाण्यासाठी आक्रमक करंजेकरांची अंत्यसंस्कारांच्या गाडीतून पालिकेला धडक
सातारा : ‘नव्या-जुन्या जलवाहिन्या, टाक्या, व्हॉल्व्ह यांच्या घोळात आम्हाला अडकायचे नाही. पालिका आणि जीवन प्राधिकरणाच्या मध्ये ‘फुटबॉल’ व्हायचे नाही; आम्हाला फक्त पाणी पाहिजे,’ अशी गर्जना करीत करंजे पेठेतील नागरिक बुधवारी रस्त्यावर उतरले. करंजे भागातील सर्व रस्ते दीड तास अडवून धरल्यानंतर संतप्त नागरिक आणि महिला थेट अंत्यसंस्काराच्या गाडीत जाऊन बसल्या आणि पालिकेच्या दारात ‘जय जय राम’चा कल्लोळ झाला.
करंजे पेठेत नियमित पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी पालिकेची की महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची, या गोंधळात निम्मे करंजे पाण्यापासून वंचित आहे. शनिवारपासून एक थेंब पाणी आले नाही. प्राधिकरणाचे मीटर अजून चालू झालेले नाहीत. नागरिक पाणीपट्टी पालिकेतच भरतात. पालिका प्राधिकरणाकडे बोट दाखविते. दोन्ही यंत्रणा तांत्रिक कारणे सांगतात आणि पाणी मात्र मिळत नाही, अशी कैफियत नागरिकांनी मांडली. अंत्यसंस्कारांची गाडी पालिकेच्या दारात थांबताच नागरिकांनी राजपथावरील वाहतूक काही काळ रोखून धरली. महिलावर्ग यात आघाडीवर होता. नंतर ‘पालिका जय जय राम,’ ‘एवढी माणसं कशाला, पालिकेच्या मयतीला’ अशा घोषणा देत जमाव पालिकेत घुसला.
थेट नगराध्यक्षांच्या दालनातच जाऊन नागरिक मोठमोठ्याने कैफियत मांडू लागले. नगराध्यक्ष सचिन सारस, उपनगराध्यक्षा दीपाली गोडसे, नगरसेवक अविनाश कदम, अमोल मोहिते, दत्तात्रय बनकर, भाग्यवंत कुंभार आदींनी पालिकेच्या बाजूने ‘बॅटिंग’ करण्याचा प्रयत्न केला.
मुख्याधिकारी अभिजित बापट, पाणीपुरवठा खात्याचे पी. एन. साठे यांनीही ‘गार्ड’ घेतले; परंतु जमाव ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. दीड महिन्यापासून करंजेतील निम्म्या भागावर अन्याय होत असून, काही ठिकाणी नियमित पाणी येते तर काही भाग कोरडा आहे, हे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
श्रीपतराव पाटील हायस्कूलजवळचा बंद केलेला व्हॉल्व्ह तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली. नगराध्यक्षांनीही तसे आदेश दिले आणि क्षोभ थोपविला. (प्रतिनिधी)
‘त्यांना’च इकडे बोलवा
नगराध्यक्ष, नगरसेवक, अधिकाऱ्यांबरोबरच शिवसेनेचे नरेंद्र पाटीलही नागरिकांना आवरण्यासाठी खिंड लढवीत होते. जीवन प्राधिकरणानेच करंजे पेठेला पाणी देणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. ‘आपण सगळेच प्राधिकरणाच्या कार्यालयात जाऊ,’ असे नगरसेवक अविनाश कदम यांनी नागरिकांना सांगितले, तेव्हा नागरिक आणखी संतप्त झाले. ‘भर उन्हाळ्यात प्यायला सकाळपासून एक थेंब पाणी नाही. उन्हात आंदोलन करीत आहोत. आता आम्ही तिकडे येणार नाही. त्यांनाच इकडे बोलवा,’ असा पवित्रा त्यांनी घेतला.
‘दोन्हीघरचा
पाहुणा’ तहानलेला
करंजे गावठाण आणि पेठेच्या काही भागात गेल्या दीड महिन्यापासून पाण्याची तीव्र टंचाई आहे. जीवन प्राधिकरणाच्या नव्या वाहिन्या जोडल्यानंतर पाणीप्रश्न सुटण्याऐवजी बिकट बनला आहे. पालिकेच्या जुन्या जलवाहिन्यांमधील पाण्याने काही महिन्यांपूर्वी गॅस्ट्रोची लागण झाली होती. तथापि, त्यावेळी निदान पाणी मिळत तरी होते, आता तेही बंद झाले, असा सूर नागरिक आळवत होते.
हे मतांपुरते, ते वसुलीपुरते!
पालिकेच्या मुख्य दरवाजात येताच नागरिकांनी ‘करंजेतील नगरसेवक कुठे आहेत,’ असा सवाल उपस्थित केला. पाण्यासाठी रास्ता रोको आंदोलन सुरू असताना चार नगरसेवकांपैकी तसेच अधिकाऱ्यांपैकी कोणीही तिकडे फिरकले नसल्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. केवळ मतांपुरत्या येणाऱ्या नगरसेवकांचा धिक्कार करून नगराध्यक्षांच्या दालनात शिरलेल्या नागरिकांना ‘ही पालिकेची नव्हे; प्राधिकरणाची जबाबदारी आहे,’ असे ऐकावे लागले. त्यामुळेही क्षोभ उसळला आणि ‘वसुलीसाठी पालिकेचे अधिकारी कसे येतात,’ असा उलट सवाल नागरिकांनी केला.
अशास्त्रीय जोडणीचा फटका?
करंजे भागातील सुमारे दहा हजार लोकसंख्येसाठी बांधण्यात आलेली पाण्याची टाकी केवळ पाच लाख लिटरची असल्याने पाणी पुरत नाही, असे तांत्रिक कारण भाग्यवंत कुंभार यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, बसाप्पा पेठेतून करंजेकडे येणाऱ्या मुख्य वाहिनीलाच दीडशे जोड देण्यात आले असल्याने पाणी पुढे सरकतच नाही, असा दावा नागरिकांनी केला.