जनतेच्या दारात भाऊबंदकी
By admin | Published: October 24, 2015 01:06 AM2015-10-24T01:06:12+5:302015-10-24T01:09:11+5:30
जाऊबार्इंमध्ये चुरस : मतदारांची भूमिका मात्र अजूनही गुलदस्त्यात
कोल्हापूर : शिवाजी पेठेतील प्रभाग क्रमांक ४७ - फिरंगाई मतदारसंघात इंगवले कुटुंबातील भाऊबंदकी जनतेच्या दारात उभी आहे. कुटुंबातील मतभेद थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शहरातील ही बहुदा पहिलीच वेळ आहे. तेजस्विनी इंगवले आणि प्रज्ञा इंगवले नात्याने जाऊबाई असलेल्या परस्परविरोधी उमेदवार जेव्हा मतदारांच्या गाठीभेटी घ्यायला जातात, तेव्हा दोघींनाही प्रतिसाद मिळतोय. मतदार आपली कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता केवळ ‘हो तुम्हालाच’ असे सांगून मोकळे होतात. त्यामुळे येथे विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, हा उत्कंठेचा विषय आहे.
माजी उपमहापौर रविकिरण विष्णुपंत इंगवले आणि अजय पांडुरंग इंगवले या दोन चुलतभावांत दोन वर्षांत मतभेद निर्माण झाले आहेत. कौटुंबिक विषय असल्याने या वादात बाहेरच्या कोणीही लक्ष घातले नाही. त्यामुळे फिरंगाई तालीम मंडळाच्या माध्यमातून दोघेही सक्रिय राहिले. तालमीचा सुवर्णमहोत्सव तर दोघांनीही स्वतंत्रपणे साजरा करण्याचा प्रयत्न केला. त्यातून मतभेदाची दरी अधिकच रूंदावत गेली. आता तर त्यांनी एकमेकांना महापालिका निवडणुकीत आव्हान दिले आहे.
निवडणुकीसाठी दोघा भावांनी तयारी केली; पण ‘सर्वसाधारण महिला’ असे आरक्षण पडल्याने त्यांनी पत्नींना रिंगणात उतरविले. रविकिरण यांनी तेजस्विनी यांना पहिल्या दणक्यातच ताराराणी आघाडीची उमेदवारी मिळवून घेतली. नंतर त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना, आदी पक्षांच्या नेत्यांना भेटून तेजस्विनीच्या विरोधात प्रज्ञा इंगवले यांना उमेदवारी देऊ नये यासाठी प्रयत्न केले, अशी चर्चा प्रभागात रंगली. दुर्दैवाने तसेच घडल्याने या चर्चेला बळ मिळाले. शेवटी अजय इंगवले यांनी प्रज्ञा इंगवलेंना अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सहानुभूती त्यांच्या बाजूने तयार व्हायला लागली. रविकिरण व अजय यांनी आतापर्यंत घराघरांपर्यंत जाऊन प्रचार केला आहे. हळदी-कुंकू समारंभाच्या आडून महिलांसाठी तीन-तीन वेळा स्नेहभोजने आयोजित केली आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी जे प्रयत्न करायचे आहेत, ते करत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रभागात माजी स्थायी समिती सभापती विजय साळोखे-सरदार यांच्या पत्नी अर्चना साळोखे यांना उमेदवारी दिली आहे. ‘अत्यंत साधा सरळ आणि काम करणारा कार्यकर्ता’ अशी विजय साळोखे यांची प्रभागात ओळख आहे. दहा वर्षे ते या प्रभागाचे प्रतिनिधित्व करत होते. ध्यानचंद हॉकी स्टेडियम केवळ त्यांच्या प्रयत्नातून साकारले. स्थायी समितीचे सभापतिपद म्हणजे महापालिकेच्या ‘आर्थिक चाव्यांचा रखवालदार’ मानला जातो; पण ‘सभापतिपदाच्या काळात कोणाचा एक रुपयाही न घेणार सभापती’ म्हणून त्यांनी आपली प्रतिमा सांभाळली. विजयनी कोणाचा चहा घेतला नाही की कोणाला दिलाही नाही. त्यामुळेच त्यांच्यासोबत मतदार राहिले. आता ते पत्नीसाठी मदतीची अपेक्षा करत आहेत. प्रभागात शामली उमेश जाधव (शिवसेना) व अरुणा तानाजी पसारे (कॉँग्रेस) या दोघी आपले नशीब आजमावून पाहत आहेत.
कोणीही मतदार उघडपणे बोलत नाही. कोण कोणाच्या बाजूने उभे आहे, याचा अंदाज बांधता येत नाही. मतमोजणी वेळीच त्याची प्रचिती येईल