मल्लांची डोपिंग चाचणी अनिवार्य करणार, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्षांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 12:14 PM2024-06-24T12:14:17+5:302024-06-24T12:15:18+5:30

कोल्हापुरात वस्ताद, मल्लांची पहिली गोलमेज परिषद

Doping test of wrestlers will be made mandatory, said the working president of Maharashtra State Wrestling Association | मल्लांची डोपिंग चाचणी अनिवार्य करणार, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्षांनी दिली माहिती

मल्लांची डोपिंग चाचणी अनिवार्य करणार, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्षांनी दिली माहिती

गारगोटी (जि.कोल्हापूर) : येत्या दहा वर्षांत देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्रीयन मल्ल अव्वल स्थानावर राहण्यासाठी राज्यात होणाऱ्या सर्व महत्त्वाच्या कुस्ती स्पर्धेसाठी डोपिंग चाचणी अनिवार्य करणार आहे. महाराष्ट्रातील मल्लांची कामगिरी चमकदार होण्यासाठी वस्ताद आणि प्रशिक्षकांनी नुरा कुस्ती करणाऱ्या मल्लांना आणि दलालांना बाहेरचा रस्ता दाखविला पाहिजे, असा इशारा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी दिला.

कोनवडे (ता.भुदरगड) येथे खासबाग केसरी कुस्ती मैदान समितीच्या वतीने आयोजित केलेल्या वस्ताद आणि मल्लांच्या कुस्ती क्षेत्रातील पहिल्या गोलमेज परिषदेत बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदकेसरी दीनानाथ सिंह होते. यावेळी खाशाबा जाधवांचे पुत्र रणजित जाधव, मंगेश चिवटे, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, सिनेअभिनेत्री दीपाली सय्यद उपस्थित होते. या परिषदेत सर्वांनी नुरा कुस्ती, डोपिंग याबाबत चिंता व्यक्त केली. महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर संघाचे उपाध्यक्ष व खासदार मुरलीधर मोहोळ यांची केंद्रीय मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.


नुरा कुस्ती स्पर्धेतून हद्दपार होण्यासाठी मोठ्या मल्लांच्या दोन वर्षे कुस्त्या घेऊ नका. त्यामुळे आपोआप नुरा कुस्त्यांना आळा बसेल. - अस्लम काझी,

तात्पुरत्या स्वरूपात मिळणारा नावलौकिक आणि पदकासाठी डोपिंग आणि स्टेरॉइड घेऊन आपल्या शरीराचे आणि आरोग्याचे नुकसान करू नका. पदकांपेक्षा आपले शरीर आणि आरोग्य महत्त्वाचे आहे. - विष्णू जोशीलकर, महाराष्ट्र केसरी

गोलमेज परिषदेत मंजूर झालेले ठराव

  • महाराष्ट्रात होणाऱ्या कोणत्याही कुस्ती मैदानात जिंकणाऱ्या मल्लास ७० टक्के, तर पराभूत मल्लास ३० टक्के रक्कम दिली जावी.
  • महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पैलवानांची डोपिंग चाचणी केली जाणार, नुरा पैलवान यांना कोणत्याही तालमीत प्रवेश देऊ नये.
  • महाराष्ट्र केसरी किंवा हिंदकेसरी, रुस्तुम ए हिंदकेसरी या नावाचा दुरुपयोग अन्य खेळांमध्ये करू नये.
  • स्थानिक कुस्ती संघटनेतर्फे किंवा वेगवेगळ्या तालीम संघांतर्फे देण्यात येणाऱ्या मैदान परवानगीमध्ये आयोजकांना काही अटी व नियम घालून द्यावेत. नुरा कुस्ती ठेवू नये,
  • ऑलिम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार मिळावा.
  • गावोगावी बंद पडलेल्या तालमी पुन्हा चालू करून त्यांना शासनातर्फे अत्याधुनिक दर्जाची मॅट व जिम साहित्य देऊन पुन्हा ऊर्जितावस्थेत आणणे

Web Title: Doping test of wrestlers will be made mandatory, said the working president of Maharashtra State Wrestling Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.