जयसिंगपुरात बेशिस्त पार्किंगला हवा शिस्तीचा डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:16 AM2021-02-22T04:16:26+5:302021-02-22T04:16:26+5:30
संदीप बावचे जयसिंगपूर : शहरातील पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला आहे. वाहतुकीची शिस्त बिघडल्याने पुन्हा सार्वजनिक ठिकाणी वाहनांचा बेशिस्तपणा वाढला ...
संदीप बावचे
जयसिंगपूर : शहरातील पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला आहे. वाहतुकीची शिस्त बिघडल्याने पुन्हा सार्वजनिक ठिकाणी वाहनांचा बेशिस्तपणा वाढला आहे. क्रांती चौकात बेशिस्तीने वाहने उभी केली जातात. त्यामुळे अन्य वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यापूर्वी पांढरे पट्टे मारून वाहने पार्किंगला शिस्त लावण्याचा प्रयत्न झाला होता. ही मोहीम जयसिंगपूर पोलिसांनी पुन्हा राबविण्याची गरज बनली आहे.
सांगली-कोल्हापूर महामार्ग जयसिंगपूर शहर वसले आहे. मोठी बाजारपेठ असल्याने आसपासच्या खेड्यातील अनेक नागरिक दैनंदिन व्यवहारासाठी येथे येतात. वाढती वाहन संख्या विचारात घेता पार्किंगची समस्याही गंभीर बनत चालली आहे. शहराला वाहतुकीची शिस्त लागावी, यासाठी सम-विषम पार्किंगचा प्रयोग सुरुवातीला राबविण्यात आला. शिरोळ रोड, रेल्वे स्टेशन, महामार्ग याचबरोबर आठवडी बाजाराला शिस्त लागावी यासाठी पोलीस प्रशासनाने सामाजिक संस्थांच्या मदतीने केलेल्या प्रयत्नाला यशदेखील आले.
लॉकडाऊननंतर शहरातील वाहतुकीची शिस्त पुन्हा बिघडली आहे. बेशिस्त वाहतुकीमुळे वाहनांच्या रहदारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. रविवारचा आठवडा बाजार भरतो, मोठ्या संख्येने ग्राहक व व्यापारी बाजारात येतात. चार गल्ल्यांतून बाजार भरत असल्याने बाजाराबरोबरच वाहनांमुळे रस्त्यांचा श्वास गुदमरत आहे. दैनंदिन पार्किंग व्यवस्थेचाही फज्जा उडाला आहे. क्रांती चौकात पानटपर्यांसमोर बेशिस्तपणे वाहने लावली जातात. त्यामुळे या बेशिस्त पार्किंगला जयसिंगपूर पोलिसांनी शिस्तीचा डोस देण्याची गरज आहे. सध्या दोन वाहतूक पोलिसांवरच शहराचा ताण आहे. त्यामुळे आणखी संख्याबळ वाढविण्याची गरज आहे.
----------------------------
वाहतूक शिस्तीचे तीनतेरा
शहरात बेशिस्त पार्किंग करणार्याना शिस्त लावण्यासाठी पोलीस प्रशासनाने क्रेनची सुविधा सुरू केली. नो पार्किंगमध्ये लावलेली वाहने उचलून दंडात्मक कारवाई सुरू झाल्याने काही काळ वाहतुकीला शिस्तही लागली होती. मात्र, सध्या क्रेन बंद असल्याने पुन्हा वाहतूक शिस्तीचे तीनतेरा वाजले आहेत. पोलिसांनीदेखील यामुळे मर्यादा आली आहे.
फोटो - २१०२२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ - जयसिंगपूर येथे क्रांती चौकात अशाप्रकारे बेशिस्तपणे वाहने लावली जातात.