जीबी सिंड्रोम'साठी सव्वा लाखाचा डोस, कोल्हापुरातील सीपीआरमधून आतापर्यंत २२ रुग्णांना दिली मोफत इंजेक्शन्स
By समीर देशपांडे | Updated: March 4, 2025 17:09 IST2025-03-04T17:08:18+5:302025-03-04T17:09:00+5:30
समीर देशपांडे कोल्हापूर : जीबी सिंड्रोमच्या जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये सीपीआरमध्ये दाखल झालेल्या २२ रुग्णांना आतापर्यंत ४४ लाख २० हजार ...

जीबी सिंड्रोम'साठी सव्वा लाखाचा डोस, कोल्हापुरातील सीपीआरमधून आतापर्यंत २२ रुग्णांना दिली मोफत इंजेक्शन्स
समीर देशपांडे
कोल्हापूर: जीबी सिंड्रोमच्या जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये सीपीआरमध्ये दाखल झालेल्या २२ रुग्णांना आतापर्यंत ४४ लाख २० हजार रुपयांची इंजेक्शन्स मोफत दिली आहेत. यासाठीचा आवश्यक तो साठा सीपीआरमध्ये करण्यात आला आहे.
जीबी सिंड्रोमची लागण झालेल्या रुग्णाचे हात, पाय शक्तिहीन होतात. प्रतिकारशक्ती कमी झालेल्या नागरिकांना याची लागण होऊ शकते. कधी-कधी पक्षाघातही होऊ शकतो, तर मेंदूवरही त्याचा परिणाम हाेऊ शकतो. पुण्यामध्ये जानेवारीमध्ये अनेक जणांना लागण होऊन काहींचा मृत्यूही झाला होता. एकाच भागातील रुग्णांना हा आजार झाल्याचे निष्पन्न झाले होते. यानंतर, अनेक जिल्ह्यातून अशा रुग्णांच्या बातम्या येऊ लागल्या.
कोल्हापूर जिल्ह्यात १ जानेवारी ते ३ मार्च २०२५ पर्यंत २२ जणांना जीबी सिंड्रोमची लागण झाली आहे. यावर जालीम उपाय म्हणजे आयव्ही इम्युनोग्लोब्युलिनचा डोस रुग्णाला दिला जातो. त्या रुग्णाच्या वजनाप्रमाणे एकदाच हा डोस द्यावा लागतो. या डोसची ५ ग्रॅमच्या कुपीची किंमत १० हजार रुपये आहे. म्हणजे जर ७० किलो वजनाचा रुग्ण असेल, तर त्याला तब्बल १ लाख ४० हजार रुपयांचा डोस द्यावा लागतो आणि त्यानुसार हे डोस दिलेही जात आहेत. आतापर्यंत या सर्व रुग्णांना ४४२ कुपी डोस देण्यात आले आहेत. याची किंमत तब्बल ४४ लाख २० हजार रुपये इतकी होते, तसेच या रुग्णांना प्लाज्माही द्यावा लागतो, तोही आवश्यक प्रमाणात देण्यात आला आहे.
फिजिओथेरपीची सोय
जीबीच्या रुग्णांना गरज भासल्यास व्हेंटिलेटर लावावा लागतो. त्यामुळे त्यांना न्युमोनियाही होण्याची शक्यता असते. हातापायातील शक्ती गेल्याने अनेक वेळा त्यांना उपचारानंतर फिजिओथेरपीची गरज भासते. अनेक आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्यांना बाहेरची ही सेवा परवडत नाही. सीपीआरमध्ये यासाठी सुसज्ज यंत्रणेसह दोन कक्ष असून, पूर्णवेळ या ठिकाणी फिजिओथेरपी केल जाते. जीबीच्या रुग्णांना छातीसाठी फिजिओथेरपी करावी लागते. ती या ठिकाणी मोफत करण्यात येत आहे.
तब्येत दाखवण्यासाठी आलेल्या काही रुग्णांची लक्षणे पाहिल्यानंतर आणि तपासणीनंतर जानेवारी २५ पासून २२ रुग्ण सीपीआर रुग्णालयात दाखल झाले. या सर्वांना अत्यावश्यक अशी ४४ लाख रुपयांची इंजेक्शन्स मोफत देण्यात आली आहेत, तसेच फिजिओथेरपीही केली जात आहे. - डॉ.एस.एस. गुरव, अधिष्ठाता, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर.