शेतकरी अपघात विमा योजनेचा दुहेरी फायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 12:38 AM2019-09-03T00:38:07+5:302019-09-03T00:38:11+5:30
विश्वास पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या वहिती खातेधारक शेतकरी व त्यांच्या ...
विश्वास पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या वहिती खातेधारक शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांपैकी एकास आता या योजनेचा लाभ मिळणार आहे. कृषी विभागाने त्यासंबंधीचा शासन आदेश शनिवारी काढला आहे. राज्यात सुमारे १ कोटी ५२ लाख खातेदार शेतकरी असून त्याच्या दुप्पट (३ कोटी ४ लाख) लोकांना त्याचा फायदा होऊ शकेल. शेतकऱ्याला स्वत:शिवाय अन्य कुणाला या योजनेचा लाभ द्यायचा. त्याचे नाव योजनेसाठी (नॉमिनीप्रमाणे) अगोदर सुचवावे लागेल.
शेती करताना होणारे अपघात किंवा इतर नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात यामध्ये शेतकºयाचा मृत्यू ओढावतो किंवा काहींना कायमचे अपंगत्व येते. कर्त्या व्यक्तीस अपघात झाल्याने कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होते. अशा कुटुंबांना लाभ देण्यासाठी शासनातर्फे ही योजना २००४ पासून राबविण्यात येत आहे. योजनेंतर्गत पात्र शेतकºयास २ लाख रकमेचे विमा संरक्षण दिले जाते; परंतु आतापर्यंत एकट्या शेतकºयालाच या योजनेचा लाभ मिळत होता. त्यामुळे योजनेचा लाभ कुटुंबियांनाही मिळावा, अशी मागणी खूप दिवसांपासून सुरू होती.
कशासाठी मिळणार विमा संरक्षण
वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात.
कुणाला मिळणार संरक्षण
राज्यातील १ कोटी ५२ लाख खातेदार शेतकरी व खातेदार म्हणून नोंद नसलेले शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य त्यामध्ये आई-वडील,पती-पत्नी मुलगा किंवा अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती.
विमा हप्त्याचे काय
योजनेंतर्गत शेतकरी किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही विमा कंपनीकडे स्वतंत्ररीत्या विमा हप्ता भरण्याची गरज नाही. ही संपूर्ण रक्कम शासनामार्फत विमा कंपनीकडे भरली जाईल. या योजनेंतर्गत मिळणारे लाभ स्वतंत्रच असेल.
किती मिळणार भरपाई
मृत्यू झाल्यास २ लाख, दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय किंवा एकाचवेळी एक हात, एक पाय व एक डोळा निकामी झाल्यासही २ लाख मिळणार. एक डोळा, एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास १ लाख रुपये मिळणार.