इचलकरंजी शहरातील नागरिकांसमोर दुहेरी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:32 AM2021-06-16T04:32:21+5:302021-06-16T04:32:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : सध्या शहर व परिसरात कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. ...

Double crisis facing the citizens of Ichalkaranji city | इचलकरंजी शहरातील नागरिकांसमोर दुहेरी संकट

इचलकरंजी शहरातील नागरिकांसमोर दुहेरी संकट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : सध्या शहर व परिसरात कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशा कठीण परिस्थितीत डेंग्यू आजाराने पुन्हा डोके वर काढल्याने शहरवासीयांच्या चिंतेत वाढ झाली आहे. शहरात अद्यापही कोरोनाचा संसर्ग कमी झालेला नसताना डेंग्यूसदृश रुग्ण आढळत असल्याने स्थानिक आरोग्य विभागाला कसरत करावी लागणार आहे.

पावसाला अद्याप खरी सुरुवात झाली नसली तरी यंदा डेंग्यूचे रुग्ण आढळून येऊ लागले आहेत.

शहरातील गावभाग, अवधूत आखाडा, भोने माळ, झोपडपट्टीसह अनेक भागात रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे डेंग्यूच्या साथीला सुरुवात झाली असून, दुहेरी संकटामुळे नागरिक व प्रशासन हतबल झाले आहे. पावसाळा सुरू झाला की, डेंग्यूच्या डासांसाठी पूरक वातावरण निर्माण होऊन उत्पत्तीला सुरुवात होते. या डासांनी दंश केल्यास डेंग्यूची लागण होते. शहरात यंदा मान्सूनच्या पावसाला अद्याप सुरुवात झाली नसली तरी डेंग्यूचे रुग्ण सापडत असल्याने कोरोनासोबत इतर आजारांशी नागरिकांना सामना करावा लागत आहे.

शहरात कोरोना संसर्गाचे दररोज सरासरी ५० रुग्ण आढळण्याचे सत्र सुरूच आहे, तर मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. अशातच शहरात डेंग्यूसदृश आजाराचा फैलाव होत असल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. परंतु वेळेत योग्य उपचार घेतल्यास डेंग्यू पूर्ण बरा होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

पालिका प्रशासनाकडून रुग्ण असलेल्या ठिकाणी औषध फवारणी केली जात आहे. तरी नागरिकांनीही बेफिकीरपणे न राहता काळजी घेण्याची गरज आहे.

प्रतिक्रिया

शहरातील ज्या भागात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत, त्याठिकाणी औषध फवारणी करण्याचे काम सुरू आहे. पालिका प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे. तरीही नागरिकांनी खराब टायर, डबके, फुटकी भांडी यामध्ये उघड्यावर पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच घरातील फ्रीज, पाण्याची टाकी वेळच्या वेळी स्वच्छ करावेत.

डॉ. सुनीलदत्त संगेवार, आरोग्य अधिकारी

Web Title: Double crisis facing the citizens of Ichalkaranji city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.